

सिन्नर (नाशिक) : सिन्नर येथे लॉजिस्टिक पार्क साकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकार व ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक पार्क आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या घोषणेचे सिन्नर इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सिमा (Sinnar Industrial and Manufacturers Association - SIMA) ) स्वागत केले आहे.
या करारामुळे सिन्नरमध्ये 600 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. रोजगारनिर्मितीसह औद्योगिक विकासास मोठा फायदा होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत सिमाचे अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष किरण भंडारी, सचिव बबन वाजे, कोषाध्यक्ष राहुल नवले, विश्वस्त मारुती कुलकर्णी, रतन पडवळ, मुकेश देशमुख, किरण बडगुजर आदींनी केले आहे. लॉजिस्टिक पार्कमुळे कृषी क्षेत्रालाही लाभ होणार आहे.
औद्योगिक क्षेत्रात विविध वस्तूंची साठवणूक, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी ही बाब महत्त्वपूर्ण आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठ चालविण्यासाठीही लॉजिस्टिक पार्क वापरले जाऊ शकते. उद्योजकांचा माल इच्छित बाजारपेठेत पोहोचवला जातो. राज्यात सिन्नरचे महत्त्व सर्वाधिक वाढत आहे. अस्तित्वात असलेले समृद्धी महामार्ग, नाशिक - पुणे महामार्ग, सिन्नर ते शिर्डी महाम ार्ग, त्याचबरोबर ओझर व शिर्डी विमानतळाची सुविधा उपलब्ध आहेत. तर होऊ घातलेले चेन्नई - बंगळुरू सुपर हायवे, नाशिक - पुणे औद्योगिक कॉरिडोर, नाशिक - पुणे रेल्वे हे प्रकल्पही सिन्नरचे महत्त्व वाढविणारे आहेत.
लॉजिस्टिक पार्कमुळे 10 ते 20 हजारांवर बेरोजगारांना काम उपलब्ध होऊ शकेल. कुशल मनुष्यबळाची आवश्यकता राहणार असल्याने रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. लॉजिस्टिक पार्कपाठोपाठ उद्योजक गुंतवणुकीसाठी आकर्षित होऊ शकतील. त्यामुळे हा पार्क सिन्नरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे
लॉजिस्टिक पार्कमुळे औद्योगिक विकासाची मंदावलेली गती वाढेल. त्याचबरोबरच परकीय गुंतवणुकीलाही वाव आहे. उद्योग क्षेत्रातही गुंतवणूक होऊ शकेल.
बबन वाजे, सचिव सिमा