

नाशिक : ऑगस्ट २०२४मध्ये महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाला मंजुरी देताना प्रारंभी घोषित केलेल्या पाच लॉजिस्टिक हबमध्ये नाशिक-सिन्नरचा समावेश करण्यात आला होता. आता ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात बुधवारी (दि. १४) महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाल्याने सिन्नरमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यात परकीय गुंतवणूक येणार असून, त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे.
राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स व इंडस्ट्रियल पार्क्स उभारण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या करारानुसार राज्यात दहापेक्षा अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमिनीचे क्षेत्रफळ असून, त्यापैकी १.८५ कोटी चौ. फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण थेट परकीय गुंतवणूक ५ हजार १२७ कोटी रुपये इतकी आहे. या करारामुळे थेट व अप्रत्यक्ष मिळून २७ हजार ५१० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
हे लॉजिस्टिक पार्क्स सिन्नरसह नागपूर, भिवंडी, चाकण, पनवेल येथे उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त आणि रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणारे असतील.
लॉजिस्टिक हब झाल्यास जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. वाहनांची वर्दळ वाढून चलन फिरेल. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गावर दहावा मैल येथे इंटरचेंज देण्यात आले आहे. त्यामुळे या भागात लॉजिस्टिकचे जाळे तयार होईल. आडगाव, सिद्ध पिंप्री येथे मोठ्या संधी निर्माण होतील. समृद्धी महामार्गामुळे वावी व घोटी येथे छोटे लॉजिस्टिक पार्क तयार होतील व मालाची ने-आण वाढेल.