

नाशिक : दोन महिन्यांपासून सुरू असलेला एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदासाठीचा तिढा सुटला असून, जालना जिल्ह्यातील अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांची प्रतिनियुक्तीने प्रादेशिक अधिकारीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांचे ओएसडी महेंद्र पवार आणि गणेश राठोड यांच्या नावावर पूर्णविराम मिळाला आहे. पाटील २०१९ मध्ये निफाडला तहसीलदार होते.
प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल याबाबत सस्पेन्स होता. त्यात राजकीयस्तरारून घडामोडींना वेग आल्याने पाटील यांच्यासह महेंद्र पवार आणि गणेश राठोड यांच्या नावाची चर्चा रंगली होती. ३१ जुलै रोजी गवळी यांची पनवेल येथे भूसंपादनला बदली झाली तर राठोड यांना वन व महसूल विभागात ६ ऑगस्टला प्रादेशिक अधिकारी पदाच्या नियुक्तीचे आदेश आले होते. मात्र, उद्योग विभागाला विश्वासात न घेताच त्यांनी आदेश मिळविल्याने त्यांच्या नियुक्तीला ब्रेक लावला. त्यामुळे पाटील यांच्यासह पवार यांची नावे पुढे आले. यात दोन महिने नियुक्ती, बदलीचा खेळ सुरू असतानाच शनिवारी (दि.१२) पाटील यांची प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्ती झाली.
एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले गणेश राठोड यांची शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यांची ६ ऑगस्टच्या नियुक्तीच्या आदेशात अंशत: बदल करून संस्थानमध्ये नियुक्ती केली आहे.
३१ जुलै रोजी गवळी यांची पनवेलला भूसंपादनला बदली झाली होती. मात्र, तेथील अधिकाऱ्यास मुदतवाढ मिळविल्याने ही जागा गवळी यांच्या हातून गेली. आता ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गेले साडेचार वर्ष ते नाशिक एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांत त्यांची दोनदा बदली केली गेली. परंतु प्रत्येकवेळी मुदतवाढ मिळविण्यात त्यांना यश आले. आता त्यांची बदली मुंबई सिडको येथे होण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये निफाड तहसीलदार असताना दीपक पाटील यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. सेवा हमी कायद्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे आग्रही होते. मात्र, कैफियत मांडण्यासाठी आलेल्या पक्षकारांसह वकिलांना वेळ देऊनही तासन्तास त्यांना तिष्ठत ठेवत मनमानी कारभार केल्याच्या त्यांच्याबाबत तक्रारी त्यावेळी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी कानउघडणी केली होती. ही बाब जिल्हाभर चर्चेत होती.
नियुक्तीबाबतची उद्योग विभागातील प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. सोमवारी (दि.१४) उशिरापर्यंत एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदाचा पदभार स्वीकारेल.
दीपक पाटील, नवनियुक्त प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक.