नाशिक : रस्ते आणि पूल बांधणी क्षेत्राला नावीन्यपूर्ण आयाम देणाऱ्या अशोका बिल्डकॉन कंपनीने आपल्या कर्तृत्वाने सुवर्ण पुरस्काराला गवसणी घातली आहे.
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नॅशनल हायवेज एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यांतर्गत अशोकाला ग्रीन हायवेज श्रेणीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अशोका बिल्डकॉन कंपनीने तेलंगणा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ अंतर्गत कंदी ते रामसानपल्ली हा ग्रीन हायवेज प्रकल्प अपेक्षित गुणवत्तेसह पूर्ण केला. या मार्गावरील जिवंत वृक्षांचे संगोपन करण्याकडेही अशोकाने विशेष काळजी वाहिली. या सर्व बाबींची दखल घेऊन नवी दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल हायवेज एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यात अशोकाला केंद्रीय मंत्रीद्वयींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अशोकाच्या वतीने अनिल गांधी आणि प्रशांत जोशी यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. अशोकाच्या समृद्ध परंपरेने महाराष्ट्राचा लौकिक वाढला असल्याचे गडकरी म्हणाले.
ग्रीन हायवेज श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्काराने सन्मानित होणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. हा बहुमान प्रकल्प निर्माण प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या अशोकाच्या प्रत्येक सदस्याच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे.
अशोक कटारिया, चेअरमन, अशोका बिल्डकॉन