नाशिक : डॉक्टरांवरील प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस गस्तीदरम्यान देणार रुग्णालयांना भेटी

नाशिक : डॉक्टरांवरील प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस गस्तीदरम्यान देणार रुग्णालयांना भेटी

नाशिक : ऑनलाइन डेस्क

डॉ. राठी यांच्यावरील हल्ल्याने वैद्यकीय व्यावसायिक हादरले आहे. या पार्श्वभूमीवर, डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश देण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA – Indian Medical Association) निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही मागणी मान्य केली आहे. शहरातील रुग्णालयांना नियमित गस्तीदरम्यान पोलीस भेट देणार आहेत.  स्थानिक पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांचे संयुक्त गट तयार करून डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन कर्णिक यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना दिले असून लवकरच रुग्णालयांना भेटी दिल्या जातील असेही यावेळी सांगण्यात आले.

डॉ. राठी यांच्यावर रुग्णालयात रात्री काम करत असताना प्राणघातक हल्ला झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयएमए सभागृहात विविध वैद्यकीय व्यावसायिक संघटनांची तातडीने बैठक पार पडली. यामध्ये आयएमए (Indian Medical Association) नाशिक, आयएमए नाशिकरोड, पंचवटी, फिजिशियन, दंत, होमिओपॅथी अशा विविध संघटनांचे पदाधिकारी व सुमारे दोनशे डॉक्टरांची उपस्थित होती. रुग्णालयात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. बैठकीनंतर वैद्यकीय संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या बैठकीमध्ये डॉक्टरांवर रुग्णालयात होणाऱ्या हल्ल्यांविरुध्द पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आयएमए (Indian Medical Association) नाशिकचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ व नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नांजली आव्हाड यांनी व्यक्त केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबद्दल नाशिक पोलीस उपक्रम सुरू करतील, त्यास सहकार्य करण्याची तयारी आयएमएने दर्शविली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या रुग्णालयांना नियमित गस्तीवेळी पोलीस भेट देणार आहेत. यामध्ये प्रथम तीस खाटांवरील रुग्णालयांना प्राधान्य दिले जाणार आहे. या गस्तीमध्ये लहान-लहान रुग्णालयांचाही समावेश केला जाणार आहे. असे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. या उपक्रमांतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि त्या हद्दीतील डॉक्टर यांचा संयुक्त गट तयार करून संवाद केला जाणार आहे. आयएमए प्रत्येक पोलीस ठाण्यातील रुग्णालय व प्रतिनिधींचा संपर्क क्रमांकाची यादी पोलिसांना देणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news