

तालुक्यात गिरणारेजवळील नाईकवाडी शिवारात दुर्गम डोंगराळ भागात अंबाडा आणि टोमॅटो पिकांच्या आड सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदा लागवडीचा पर्दाफाश नाशिक तालुका पोलिसांनी केला. शनिवारी (दि. २१) मध्यरात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ९८० किलो वजनाची गांजासदृश हिरवीगार झाडे, पाने आणि फांद्या जप्त केल्या. या मुद्देमालाची किंमत एक कोटी ४७ लाख रुपये असून, याप्रकरणी वामन संतू गुंबाडे या संशयिताला ताब्यात घेतले.
नाईकवाडी गावाच्या हद्दीतील गट क्रमांक १४५ मधील डोंगरावरील शेतात ही लागवड केली होती. मुख्य रस्त्यापासून दूर आणि दुर्गम ठिकाणच्या या शेतापर्यंत वाहनाने पोहोचणे शक्य नसल्यामुळे पायी जावे लागते. अशा आडवळणी जागेचा फायदा घेत संशयिताने गांजाची लागवड केली होती.
मात्र, गोपनीय माहितीआधारे ही शेती उघडकीस आली. इतर पिकांच्या आड गांजाची झाडे लावून नियमित शेती सुरू असल्याचा आभास निर्माण केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यासाठी बियाणे कोठून आणले, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक मृदुला नाईक अधिक तपास करीत आहेत.
साथीदारांचा शोध सुरू
प्रतिकिलो १५ हजार रुपये दराने जप्त मुद्देमालाची किंमत एक कोटी ४७ लाख रुपये निश्चित केली आहे. प्राथमिक चौकशीत संशयिताचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. त्याचे संभाव्य साथीदार आणि गांजाच्या लागवडीमागील इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.