

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर आयएएस अधिकाऱ्याच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याच्या मित्राच्या नावाने फर्निचर विक्रीचा बहाणा करत एका वकिलाची ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ओळखीच्या व्यक्तीचे छायाचित्र आणि नाव वापरत सायबर भामट्यांनी विश्वास मिळवला. त्यानंतर फर्निचर खरेदीच्या व्यवहारातून यूपीआयद्वारे पैसे उकळले. याप्रकरणी प्रकाश वनकर (रा. पाथर्डी) यांनी इंदिरानगर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
वनकर यांना २४ ऑक्टोबरला ओमकार पवार (आयएएस) यांच्या नावाने सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट आली. ओळखीचे छायाचित्र असल्याने त्यांनी ती स्वीकारली. दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधत मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर सीआरपीएफ अधिकारी संतोषकुमार हा आपला मित्र असल्याचे सांगत त्याच्याकडे विक्रीसाठी फर्निचर उपलब्ध असल्याची माहिती दिली.
संशयिताने फर्निचरचे फोटो पाठवून त्याची किंमत १ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगितले.
वनकर यांनी खरेदीची तयारी दर्शवल्यानंतर पैसे पाठवण्यासाठी बँक खाते आणि यूपीआयची माहिती देण्यात आली. मात्र, खात्यावर पैसे जमा होत नसल्याचे सांगून संशयिताने क्यूआर कोड पाठवला. त्यावर विश्वास ठेवून वनकर यांनी ५० हजार रुपये पाठवले.
यानंतर संशयिताने आणखी माहिती घेत डेबिट कार्ड क्रमांक मागितल्याने वनकर यांना संशय आला. त्यांनी ओमकार पवार यांच्या सहायकाशी संपर्क साधून खात्री केली असता, फर्निचर विक्रीचा व्यवहार आणि संबंधित सोशल मीडिया खाते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवली.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावरील ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी झाल्यास प्रत्यक्ष संपर्क करून खात्री करावी. क्यूआर कोड स्कॅन करताना विशेष काळजी घ्यावी, असे सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे.