

नाशिक : हवामान विभागाने दिलेला येलॉ अलर्ट वरुणराजाने तंतोतंत खरा ठरवताना सोमवारी (दि.22) सायंकाळी शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. अवघ्या एक तासांमध्ये ३७ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला.गडालाही जोरदार पावसाने रात्री झोडपून काढले. जिल्ह्यात २४ धरणांमधून विसर्ग सुरू असून नांदुरमध्यमेश्वर येथून जायकवाडीकडे ३ हजार १५५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूरमधून सुमारे ५५० क्सुसेक विसर्ग सुरु होता.
हवामान विभागाने जिल्ह्यात यलो अलर्ट दिला असून २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत देखील राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्हयात सायंकाळी ठिकठिकाणी सहानंतर ढग दाटून आले. काही वेळातच पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. काही मिनिटांतच पावसाचा जोर वाढला. नाशिक शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. त्यामधून वाट काढताना वाहनचालकांची धांदल उडाली. यामूळे वाहतुकीचाही फज्जा उडाला. अवघ्या दोन ते अडीच तासांत शहरात ३७ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. नवरात्राच्या पहिल्या माळेलाच आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडविली.
नाशिक तालुक्याबरोबरच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा, येवला या भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला. सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी पाचपासून वरुणराजाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे भाविकांची पळापळ उडाली. गडावर पहिल्याच दिवशी सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
जिल्ह्यात सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी ३.७ मिमी पाऊस नोंदविला गेला. सुरगाण्यात १२.३ मिमी, चांदवडला ७.८ तर येवल्याला ७.१ मिमी पाऊस झाला. दरम्यान मंगळवारीही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावर गुरुवारी (दि.२४) एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. येत्या 28 तारखेपर्यंत तो टिकण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे. त्यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.
नवरात्र उत्सावाचा पहिला दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शहरातील कालिका यात्रेत धावपळ झाली. तसेच विक्रेत्यांचे हाल झाले. सायंकाळी दांडिया खेळणाऱ्यांचा हिरमोड झाला.