

ठळक मुद्दे
येवला, निफाडसह चांदवडला ढगफुटी सदृश पाऊस
चाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने कांदा मातीमोल
पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान
नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाने अशरश: थैमान घातले असून चांदवड, येवला निफाड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. मालेगाव, दिंडोरी, कळवण, देवळा या तालुक्यात धुवाधार बॅटिंग सुरूच असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. एकट्या चांदवड तालुक्यात ३०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून मालेगावला वीज पडून दोन बैल, एक गाय तर नांदगाव येथे एक गाय ठार झाली. निफाड तालुक्यात अनेक कांदा चाळीत पाणी शिरल्याने साठविलेला कांदा मातीमाेल झाला आहे.
यंदा मान्सूनच्या आगमनापासून जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने परतीलाही संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. नाशिक जिल्ह्यात घटस्थापनेच्या रात्रीपाून पावसाने चांगलाच जोर धरला. येवला तालुक्यातील पूर्व भागात मध्यरात्री ढगफुटी होऊन अनेक गावांतील शेतीपिके उद्धवस्त झाली. शेतांना नद्याचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी दिसून आले. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मालेगावमध्ये विज पडून चार जणावरे दगावल्याने शेती पिकांबरोबरच पशुधनाचे नुकसान झाले. निफाड तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कांदा साठवून ठेवलेल्या चाळींमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरगाणा, गणेशनगर परिसरात भात व आंबा पिकाचे नुकसान झाले. चंदवड तालुक्यातील दोन गावांत तब्बल ३०० हेक्टर कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या आदिवासी बहुल तालुक्यातही अनेक गावे आपत्तीने प्रभावित झाली.
नांदगाव, कळवणला घरांचे नुकसान
मुसळधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी येथे गंगुबाई उखा राठोड यांचे घर कोसळले. तर कळवण तालुक्यातही राजेश पांडुरंग भेटे यांचे घर पडल्याची नोंद झाली आहे. पेठ, मालेगाव, नांदगाव येथेही अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील बंहुतांशी भागात जोरदार पाऊस आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याना पाठवून लवकरात लवकर पंचनामे करून अहवालानुसार नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आहवाल सादर केला जाणार आहे.
मीनाक्षी शिंदे, नायब तहसीलदार
चांदवड तालुक्यातील पिंपळद शिवारातील शेतात असलेल्या शेततळ्यात पडून गोविंद तुकाराम चव्हाण (५२) यांचा मृत्यू झाला. हि घटना सोमवार (दि.२२) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी वडनेरभैरव पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, हिरापूर येथील शेतकरी गोविंद चव्हाण हे सोमवारी (दि.२२) रोजी पिंपळद शिवारातील शेतात गेले होते. यावेळी शेततळ्यात ते पडले. त्यांना नागरिकांच्या मदतीने शेत तळ्यातून बाहेर काढून वडाळीभोई प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस हवालदार जे. टी. मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.