

नाशिक : एचएएल विमानतळाच्या 'फनेल झोन'मुळे नाशिक महापालिका हद्दीतील २५ हजार कोटींचे बांधकाम प्रकल्प अडचणी सापडले आहेत. यामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे रहिवाशांसह बांधकाम व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, याबाबत विधान परिषदेचे सदस्य सत्यजीत तांबे यांनी विधीमंडळात तारांकीत प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाकडून सविस्तर माहिती मागविली आहे.
ओझर स्थित विमानतळाच्या 'फनेल झोन' लगतच्या सुमारे २० किमी परिसरात बांधकाम परवानगी देताना एचएएलची परवानगी घेण्याचे पत्र कंपनीने नाशिक महापालिकेस पाठविले आहे. यामुळे निम्म्या नाशकातील बांधकामे अडचणीत सापडली आहेत. मध्यंतरी याबाबत महापालिकेने एचएएल प्रशासनाशी पत्राव्दारे संपर्क साधून संबंधीत नियमावलीच्या अनुषंगाने तोडगा काढण्याबरोबरच सुधारणा करण्याविषयी कळविले होते. मात्र त्यावर अद्यापही कोणत्याही सूचना वा मार्गदर्शन मिळालेले नाही. यासंदर्भात आता विधान परिषदेचे सदस्य आ. सत्यजीत तांबे यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला असून, त्याअनुषंगाने नगरविकास विभागाने मनपाकडून संबंधीत माहिती मागविली आहे. शहरातील बांधकाम क्षेत्रात समस्या उद्भवली आहे काय, या बांधकाम बंदीमुळे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प प्रलंबित आहे का, तसेच बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे का, असे प्रश्न उपस्थित करताना ६० दिवसांत बांधकाम परवाना देण्याची कालमर्यादा या बंदीमुळे बंद होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक बांधकाम परवान्याबाबत एचएएलला अभिप्राय घ्यायचा झाल्यास कालापव्यय होण्याची शक्यता आहे का? असे प्रश्न आ. तांबे यांनी उपस्थित केले आहेत.
'एचएएल फनेल झोन'मुळे निर्माण झालेल्या या बांधकाम बंदीवर तोडगा काढण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली आहे, वा करण्यात येत आहे तसेच विलंबाची कारणे काय आहेत? अशी विचारणाही आ. तांबे यांनी तारांकीत प्रश्नाव्दारे केली आहे.