

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : दोन महिन्यांपासून निफाड, दिंडोरीसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे द्राक्ष, टोमॅटोसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपासून प्रखर सूर्यप्रकाश नसल्याने त्याचा थेट परिणाम द्राक्षबागांवर झाला आहे.
द्राक्ष वेलींच्या मुळी, पाने यांचे कार्य थांबल्याने द्राक्ष काडीच तयार झालेली नसून द्राक्ष घड निर्मितीची आता सूतराम शक्यता नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने संपूर्ण कर्जमाफी, विजबिल माफी शेतसारा माफ करून नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे दोन महिन्यांत शेतकऱ्यांना द्राक्षबागा वाचविण्यासाठी फवारणीवर मोठा खर्च करावा लागला, तरीही द्राक्ष पीक येण्याची शक्यता दिसत नाही. अशीच परिस्थिती टोमॅटो, सोयाबीन, मका पिकांची आहे. सततच्या पावसामुळे टोमॅटो लागवडी होऊ शकल्या नाही. मका, सोयाबीनची पेरणी करता आलेली नाही. जिथे टोमॅटो लागवड, मका-सोयाबीन पेरणी झाली ती पिके पावसामुळे सडली आहे. त्यामुळे शेतकरी आता कर्जफेड करूच शकत नाही. टोमॅटो हंगाम लांबणार असल्याने बाजारपेठेवर मंदीचे सावट दिसत आहे म्हणूनच शासनाने शेती आणि शेतकऱ्यांसमोर असलेली संकट बघून कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सोमनाथ मोरे, उद्धवराव निरगुडे, गणपतराव पानसरे, भास्करराव शिंदे, नंदकुमार मोरे आदींनी केली आहे.
मे महिन्याच्या सुरवातीपासून पाऊस आजपर्यंत सातत्याने कोसळत आहे. पावसामुळे शेतांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे अशा परिस्थितीत द्राक्षबाग, टोमॅटो, मका, सोयाबीन, कांदा कोणतेही पीक यंदा यशस्वी होणार नाही. म्हणूनच शासनाने कर्जमाफीसह वीजबिल, शेतसारा माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
रामराव मोरे, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत
दोन महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतलेली नाही. यामुळे शेतीची वाट लागली असून, कधी नव्हे इतकी शेती व शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यंदा शेतीतून कोणतेही उत्पादन हाती येणार नाही उभे भाजीपाला पिकही सडून गेले आहे. जिल्ह्यात असणाऱ्या कृषिमंत्र्यासह तीन मंत्र्यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस नेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
सोमनाथ आथरे, टोमॅटो उत्पादक, नाशिक