Nashik Grapes Export News | जिल्ह्याने द्राक्ष निर्यातीत ओलांडला लाखाचा टप्पा
लासलगाव : राकेश बोरा
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातून सुमारे 8 हजार कंटेनरमधून 1 लाख 10 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. मात्र, ही निर्यात गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी आहे. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला, ज्याचा थेट परिणाम द्राक्षांच्या निर्यातीवर झाला आहे.
नाशिकमधून युरोपियन देशांसह रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलँड, पोलंड, स्वीडन, स्पेन आणि इतर देशांमध्ये द्राक्षांची निर्यात होते. उत्पादनातील घट असूनही, यंदा निर्यात झालेल्या द्राक्षांना 90 ते 125 रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. द्राक्ष निर्यातदार व्यापारी लखन सावलकर म्हणाले, ‘अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असली तरी, चांगल्या दरांमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.’ शेतकर्यांनी उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा आणि हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी अधिक तयारी करणे आवश्यक आहे. तसेच सरकारनेही शेतकर्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन प्रदान करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, यंदा उत्पादन कमी झाले आहे. सुरुवातीला निर्यातीत घट झाली होती, मात्र मागील पंधरवड्यात वाढ होऊन नाशिकमधून 1.10 लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. तरीही ही निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी आहे. पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याने हंगामभर दरात तेजी राहिली. रशिया, मलेशिया आणि यूएईकडून मागणी वाढली होती. नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात द्राक्षतोडणी सुरू झाली होती आणि दर प्रतिकिलो 110 ते 130 रुपये मिळाले होते.
नेदरलँडला सर्वाधिक निर्यात
नाशिक येथील द्राक्षांची निर्यात यंदा रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलँड, पोलंड, स्वीडन आणि स्पेन या देशांमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे, सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलँडमध्ये नाशिकहून मुंबईमार्गे समुद्रमार्गाने सर्वाधिक द्राक्ष कंटेनर पोहोचले आहेत.
द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका बसल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत या हंगामात 20 टक्के द्राक्षांची कमी निर्यात झाली.
लखन सावलकर, द्राक्ष निर्यातदार व्यापारी, कोकणगाव
कंटेनर भाड्यात वाढ
रशिया-युक्रेन युद्धाची धग अजूनही सुरू असून, त्याचा फटका निर्यातदारांना बसला आहे. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गे लांबचा पल्ला गाठून सुरू आहे. त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे.

