नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरण क्षेत्रातून अद्याप विसर्ग केला गेला नसला तरी, शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी (दि.७) गोदावरी खळाळून वाहत असल्याचे दिसून आले. दुतोंड्या मारुतीला 'चरण स्पर्श करून गोदेवे पाणी दोन्ही काठ भरून वाहत होते. पाण्यात मोठ्या प्रमाणात पाणवेली वाहून आल्याने ते हटविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, पुरसदृश स्थितीमुळे गोदेच्या किनारी सुरू असलेली विकासकामे तूर्त बंद करण्यात आली आहेत. ढगफुटीसदृश पावसाचे संकट निर्माण झाल्याने, प्रशासनाने गोदाकिनारी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परिसरातील दुकानेदेखील बंद करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय गोदाकिनारी सुरू असलेले पूजाविधी बंद ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. मात्र, ढगफुटीसदृश पावसाचे संकट टळल्याने, यंत्रणेने मोठा सुटकारा सोडला.
दरम्यान, गोदेच्या पाणीपात्रात झालेली वाढ लक्षात घेता, प्रशासनाने गोदावरी पात्रालगत मोठा बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये अशा वारंवार सूचना दिल्या जात होत्या. संततधार पाऊस सुरूच असल्याने, गोदेच्या पाण्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज असल्याने, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दरम्यान, यंदाच्या मोसमात प्रथमच गोदावरी खळाळून वाहत असल्याने, गोदावरीचा पूर बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली.
स्टंट करणाऱ्याला पोलिसांचा दंडुका
संततधार पावसाने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, काही स्टंटबाजही सक्रिय झाले होते. त्यातील एकाने स्टंट करण्याची हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याने, इतर स्टंटबाजांनी तेथून काढता पाय घेतला. देवमामालेदार मंदिरासमोरील पूल पाण्याखाली गेल्याने, हा स्टंटबाज छत्री घेऊन पुलावरून स्टंट करीत होता. पोलिसांनी त्याला काठावर येऊ दिले. त्यानंतर त्याला चांगलाच दंडुका दाखविला. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुढील काही दिवस दुकाने बंद
मेन रोडवरील दुकाने बंद ढगफुटीसदृश पावसाच्या शक्यतेमुळे प्रशासनाकडून गोदावरी नदी व परिसरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड परिसरातील बहुतांश दुकाने बंद ठेवली होती. याशिवाय गोदावरी नदीपात्रालगत असलेली दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ढगफुटी पावसाचे संकट टळल्यानंतर काही विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली. दशक्रिया विधीदेखील सुरू करण्यात आले होते.
विकासकामे पडली बंद
आगामी सिंहस्थासाठी गोदावरी पात्रालगत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. वस्त्रांतरगृह पाडल्यानंतर त्याला लागून सध्या विकासकामे केली जात आहेत. मात्र, पावसामुळे विकासकामांसाठी केलेले खड़े तुडुंब भरल्याने, कामे बंद ठेवण्यात आली.
यंदा 'तो' कंटेनर हटविला
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे दररोज केल्या जाणाऱ्या गोदावरीच्या महाआरतीसाठीचे साहित्य असलेला 'कंटेनर' यंदा मात्र हटविण्यात आला आहे. गेल्यावर्षी हा कंटेनर पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. यंदा मात्र, गोदेच्या पाणीपातळीत वाढ होताच, तो हटविण्यात आला आहे.