

घोटी (नाशिक) : दिवसेंदिवस व्यवसायाचा आलेख कमी होत असलेल्या घोटी शहरातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न व स्वच्छतेविषयी चर्चेत असणार्या घोटी ग्रामपंचायतीत ग्रामपालिका पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांनी सोमवार (दि.15) पासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून तटपुंज्या वेतनावर कर्मचारी काम करत असून, वेतनवाढ झाली नसल्याने कर्मचार्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. ग्रामपालिका प्रशासक, व पंचायत अधिकारी यांनी काही पदाधिकार्यांसह कर्मचार्यांची भेट घेतली, मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
आंदोलक कर्मचार्यांनी आजपासून वेतनातील मागील फरकासह किमान वेतनात वाढ करावी, अशी मागणी कायम ठेवली. आंदोलनात मुख्य प्लंबर हिरामण धुाळ, बबन भगत, प्रमोद भोर, नीलेश काळे, कमलाकर धोंगडे, किरण कुलथे, महेश पवार आदींसह पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, दिवसभरात घोटी शहरातील विविध सामाजिक क्षेत्रांत वावरणार्या कार्यकर्त्यांनी भेटी देऊन कर्मचार्यांच्या मागणीचे समर्थन करून पाठिंबा दिला. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर ग्रामपालिका आरोग्य कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मध्यस्थी निष्फळ
ग्रामपालिका प्रशासक ज्ञानेश्वर कराळे, ग्रामपालिका अधिकारी बाजीराव डांगे यांच्यासह माजी सरपंच रामदास शेलार, राजेंद्र जाधव, संजय आरोटे, प्रशांत रूपवते, गणेश काळे, अनिल काळे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचार्यांची समजूत काढली. मात्र गतवेळीच्या आंदोलनात दिलेल्या आश्वासनाची अंलबजावणी झाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत वेतनवाढीचा तत्काळ निर्णय घ्यावा. वेतनवाढ निर्णय झाल्याखेरीज कर्मचारी मागे हटणार नाहीत अशी भूमिका व्यक्त केली.