

घोटी (नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र पवार यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा सर्वोच्च पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील पुसा कॅम्पस येथे आयोजित समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक शेतीकडे वळलेल्या राजेंद्र पवार यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांनी विषमुक्त व जैविक शेतीचा ध्यास घेत पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेतीमाल उत्पादनावर भर दिला. बायो मी टेक्नॉलॉजीज प्रा. लि.च्या माध्यमातून सेंद्रिय शेतीविषयक प्रशिक्षण घेतले असून, कंपनीचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल घाडगे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. पुरस्काराबद्दल राजेंद्र पवार यांचे अभिनंदन होत आहे.