

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्यांवर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने अंतिम यादी प्रसिद्धीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी सर्वच महापालिकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, मुदतवाढीच्या मागणीवर आम्ही विचार करू; परंतु, तुम्ही निवडणुकांची तयारी ठेवा, अशा स्पष्ट सूचना निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मनपांना दिल्या आहेत.
तब्बल साडेतीन वर्षे लांबलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी या निवडणुकांबाबत नागरिक, इच्छुकांच्या मनात अद्यापही संभ्रम कायम आहे. नाशिक महापालिकेची अंतिम प्रभागरचना आणि प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीनंतर आता प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदारयाद्यांमध्ये राज्यभर मोठ्या प्रमाणावर व्यक्तीच्या नावांचा समावेश असून, एका प्रभागातील मतदार लगतच्या दुसन्या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये टाकण्यात आल्याने या मतदार याद्यांवर हरकतीचा अक्षरशः पाऊस पडला.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार येत्या १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांशी दुरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. प्रभारी आयुक्त मनिषा नायर यांनी या बैठकीला हजेरी लावली. राज्यातील बहुसंख्या महापालिकांनी अंतिम यादी प्रसिद्धीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी आयोगाकडे केली. त्यावर अंतिम प्रसिद्धीसाठी किती वेळ हवा अशी विचारणा आयोगाने केल्याचे वृत्त आहे.
मुदतवाढीची शक्यता
आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या मतदार यार्यावर आलेल्या हरकतीबाबत माहिती जाणून घेतली. हरकतींची मोठी संख्या लक्षात घेता अंतिम मतदार याद्या प्रसिध्दीसाठी मुदतवाढीची मागणी महापालिकांकडून करण्यात आली. यावर मुदतवाढीच्या मागणीवर विचार केला जाईल, परंतु न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणुकांची तयारी ठेवा असे निर्देश निवडणूक आयुक्तांनी दिल्याचे समजते.