

नाशिक : भुसुरुंग व तत्सम स्फोटासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनच्या तब्बल एक हजारपेक्षा जास्त कांड्या मुंबई नाका सर्कलवरील नंदिनी नदीच्या काठावर संशयास्पदरित्या बेवारस आढळल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना रविवारी (दि.३१) दुपारी ३.३० ते चारच्या सुमारास उघडकीस आली. बॉम्ब शोधक व नाशिक पथकासह गुन्हे शोध पथकासह मुंबईनाका पोलिसांनी बेवारस जिलेटीनच्या कांड्यांची तपासणी केल्यानंतर त्या कालबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, आता या कांड्या कोणी व का बेवारस फेकल्या याचा तपास सुरु झाला असून तांत्रिक विश्लेषणानुसार संशयिताचा माग काढला जात आहे.
भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहामागील बाजूस असलेल्या नंदिनी नदीच्या काठावर संशयास्पदरित्या पांढऱ्या रंगाच्या चार प्लास्टिक गाेण्यांत जिलेटीन कांड्या अस्ताव्यस्त असल्याची माहिती शहर नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या गोण्यांमध्ये जिलेटीनच्या कांड्या असल्याचे दिसताच बॉम्ब शोधक व नाशक पथकासह (बीडीडीएस) श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तपासणी पूर्ण झाल्यावर संबंधित जिलेटीन कांड्या कालबाह्य असल्याचे पथकाने स्पष्ट केले.
गणेशोत्सवाचा जल्लोष वाढत असताना भरवस्तीत या स्वरूपाचे घातक व स्फोटक पदार्थ आढळल्याने शहरात दुपारनंतर एकच खळबळ उडाली. काहींनी या जिलेटीनचे लाईव्ह चित्रण करुन सोशल मीडियावर रिल्स अपलोड केल्याचे आढळून आले. पोलिसांनीही तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रित केली. मात्र, सणोत्सवात हे विघातक कृत्य करण्याचा डाव आखणारे किंवा अजाणतेपणातून हे कृत्य करणाऱ्यांचा माग आता पोलीस काढत आहे. संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यासह आवश्यक कारवाईस प्रारंभ झाला आहे.
दरम्यान, जिलेटीनच्या कांड्या या स्फाेटक असून त्याचा वापर विशेषतः खाणकाम, विहिरी खणणे, डोंगर, रस्ते किंवा इतर कामांदरम्यान अडथळा ठरणारे मोठमोठे दगड किंवा खडक फोडण्यासाठी केला जातो. यामध्ये मोठे होल किंवा छिद्र करून त्यामध्ये कांड्या ठेवल्या जातात, त्यानंतर लांबून (लांब अंतरावरुन) वात पेटवून स्फोट घडवून आणला जातो. कांड्यांचा स्फोट होऊन दुर्घटनाही घडल्या आहेत. यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कधीकधी विकृत प्रवृत्तीचे लोक जाणून बुजून या कांड्यांचा वापर करून विध्वंस घडवतात, असेही समोर आले आहे.