

नाशिक (इंदिरानगर): गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वालदेवी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीला पूर आला आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास, पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून दुचाकीसह दोन तरुण नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. मात्र, नदीकिनारी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे या दोघांचेही प्राण वाचवण्यात यश आले आहे.
संसरी गावचे रहिवासी असलेले सार्थक शर्मा (वय २२) आणि संजय बारकू गोडसे (वय १३) हे दोघे दुचाकीवरून पाथर्डी गावाकडून दाढेगावकडे प्रवास करत होते. वालदेवी नदीवरील पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत होते. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि दोघेही थेट नदीत कोसळले.
त्यांना वाहून जाताना पाहून नदीकाठी असलेल्या नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. क्षणाचाही विलंब न लावता, गावातील बापू जाधव आणि राजाराम पवार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुरात उडी घेतली. त्यांनी मोठ्या शर्थीने संजय गोडसे याला सुरक्षित बाहेर काढले. तर दुसरीकडे, प्रवाहात अडकलेल्या सार्थक शर्मा याला वाचवण्यासाठी इतर ग्रामस्थांनी दोरी फेकून त्याला पाण्याबाहेर काढले.
दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू
या थरारक घटनेत दोन्ही तरुण जखमी झाले असून, त्यांना तातडीने नाशिक रोड येथील जयरामभाई बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून, या दोन्ही तरुणांना वाचवणाऱ्या ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.