नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कुरीअरमध्ये ड्रग्ज आढळले असून, तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई टाळण्यासाठी बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगत भामट्यांनी शहरातील तरुणाला १० लाख ४५ हजार २८१ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
चार्वाक चौक परिसरातील ३१ वर्षीय रहिवासी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याला २६ मार्च रोजी दुपारी फसवले. त्याला भामट्याने फोन करून तो फेडेक्स कस्टमर केअर कंपनीतील सिनिअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगितले. तसेच 'तुमच्यासह इतर साथीदारांच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे' असे तरुणाला सांगितले होते. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रान्च व नार्काेटिक्स कंट्राेल ब्युराे (एनसीबी) पथकाने कारवाई केली आहे. तरुणाने मी कोणत्याही प्रकारचे कुरिअर मागवले नसल्याचे सांगितले. तरी भामट्याने त्याला कारवाईची भीती दाखवून धमकावले. ड्रग्जचे प्रकरण मिटवण्यासाठी व कारवाई होऊ नये यासाठी एनसीबी व पोलिसांच्या बँक खात्यात पैसे टाका असा दबाव भामट्याने त्याच्यावर टाकला. त्यामुळे भीतीपोटी तरुणाने भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे टाकले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांकडे धाव घेत ज्या व्यक्तीने संपर्क साधला व ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले, त्या बँक खातेधारकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस दल किंवा शासकीय तपास यंत्रणा नागरिकांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत नाही. सायबर फसवणुकीत हा प्रकार नव्याने समाेर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फाेन कॉल्सला बळी पडू नये. फोन आल्यास संबंधितांना ब्लॉक करावे किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. या माध्यमातून असे गुन्हे टाळता येतील. -रियाज शेख, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
——-०——–
हेही वाचा –