

नाशिक : नाशिकमध्ये उन्हाचा चटका वाढल्याने, त्याचा फटका एका चिमुरडीला बसला आहे. इंदापूरहून नाशिकला लग्नासाठी आलेल्या चार महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इंदापूर येथील काटेकर कुटुंब एका विवाह सोहळ्यासाठी खासगी ट्रॅव्हलने नाशिकला आले होते. नाशिकरोडच्या सामनगाव रोड परिसरातील एका लॉन्सवर हा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, प्रवासादरम्यान बसमधील उष्णतेचा फटका या चिमुरडीला बसल्याची माहिती पुढे येत आहे. पहाटेच्या सुमारास आईला आपली चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकचे तापमान ४२ अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी विशेषतः लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
... अन् आनंद विरला
मृत चिमुरडीची आई प्रतीक्षा काटेकर यांची नुकतीच महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे. मुलगी लहान असल्याने त्यांनी सेवेत रुजू होण्यासाठी विभागाकडून मुदत मागून घेतली होती. मात्र, प्रशिक्षणाला जाण्यापूर्वीच काळाने त्यांच्या पोटच्या गोळ्याला हिरावून नेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धुळ्यात शेतकऱ्याचा उष्माघातेने मृत्यू
धुळे : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कुंडाणे वेल्हाणे येथे एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. उन्हात काम केल्यानंतर तो घरी परत आला. यावेळी त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने तो झोपला. यात झोपेतच त्याचे निधन झाले.
योगेश सीताराम पाटील (४४) हे शेतमजुरीचे काम करतात. त्यांनी भर उन्हामध्ये दिवसभर मजुरीचे काम केले. यानंतर ते सायंकाळी ७ ला घरी परतले. यावेळी त्यांनी घरी उन्हामुळे त्रास होत असल्याने आपण छतावर झोपण्यासाठी जात असल्याचे सांगून ते छतावर निघून गेले. सायंकाळी उशिरा त्यांना परिवारातील सदस्य जेवण करण्यासाठी उठवण्यासाठी गेले असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली.