

Nashik Bakrid preparations
मालेगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, जनावरांच्या कुर्बानीसाठी शहरातील विविध भागांत तात्पुरत्या कत्तलखान्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी केवळ मनपाने निश्चित केलेल्या कत्तलखान्यांमध्येच कुर्बानी करावी. उघड्यावर, गल्ली-बोळात किंवा रस्त्यांवर कुर्बानी करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
यासंदर्भात बुधवारी (दि.१३) दुपारी मनपा सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ व मनपा आयुक्त रवींद्र जाधव उपस्थित होते. येत्या २८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने विविध प्रशासकीय उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कुर्बानीसंदर्भातील नियम व सूचना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
उघड्यावर मांस किंवा कचरा टाकल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मांसाचे तुकडे व अन्य वेस्टेज संकलित करण्यासाठी मनपाने विशेष वाहनांची व्यवस्था केली असून, नागरिकांनी कचरा निर्धारित ठिकाणीच टाकावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागनिहाय स्वच्छता निरीक्षकांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक केले जाणार आहेत. स्वच्छतेसंदर्भातील अडचणींसाठी नागरिकांना या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. शहरात चांगल्या दर्जाचे कत्तलखाने तयार करण्यात आले असून, नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी जाणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.
दरम्यान, मुस्लीम धर्मगुरू व सर्व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन कुर्बानीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे अपर पोलिस अधीक्षक गुंजाळ यांनी सांगितले. बैठकीस सहायक पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, शहर अभियंता कैलास बच्छाव, प्रभाग अधिकारी सचिन महाले यांच्यासह मनपा व पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.