Nashik Forest Department News : अश्विननगरात भरकटलेल्या सांबराची सुरक्षित सुटका

वनविभाग, पोलीस व रेस्क्यू पथकाच्या समन्वयाने वन्य प्राण्याला जीवदान
नाशिक
नाशिक: सांबराला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या डोळ्यानजीकच्या जखमेवर उपचार करताना वन्य विभागाचे डॉक्टर.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: नाशिक शहरातील अश्विननगर–पाथर्डी फाटा परिसरात मंगळवारी (दि. २३ डिसेंबर २०२५) सकाळी भरकटलेले सांबर सैरावैरा धावत असल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई–आग्रा महामार्गालगत हा वन्यप्राणी आढळून आल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र वनविभाग, नाशिक शहर पोलीस व 'रेस्क्यू नाशिक डिव्हिजन' यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे या सांबराचे यशस्वी व सुरक्षित रेस्क्यू करत मोठी दुर्घटना टाळण्यात आली.

मंगळवारी (दि. २३) सकाळी दहाच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरात एक सांबर आल्याची माहिती वनविभागाच्या रेस्क्यू हेल्पलाइनवर प्राप्त झाली. माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) नाशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक (प्रादेशिक), वनपाल तसेच वन्यप्राणी बचाव पथक आणि रेस्क्यू नाशिक डिव्हिजनची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या सांबराचा मोकाट श्वानांकडून पाठलाग सुरू होता. या धावपळीत त्याच्या डाव्या डोळ्याला कुंपणाच्या तारेमुळे गंभीर दुखापत झालेली होती. हे सांबर मुंबई–आग्रा महामार्गालगत अश्विननगर येथील सर्व्हिस रोडवर एका झाडाखाली बसलेले आढळून आले. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने सर्व्हिस रोडवरील वाहतूक तात्काळ थांबवत सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला.

त्यानंतर रेस्क्यू नाशिक डिव्हिजनच्या वन्यजीव पशुवैद्यकांनी 'ट्रँक्विलायझेशन गन'च्या सहाय्याने बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. सुमारे पंधरा मिनिटांनंतर सांबर पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर सदर वन्यप्राण्यास अत्यंत काळजीपूर्वक ताब्यात घेऊन रेस्क्यू व्हॅनद्वारे पुढील उपचारासाठी म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलविण्यात आले.

नाशिक
NMC Election, Nashik Road Ward 22 : उबाठाकडून शिंदेसेनेला धक्का

मानवी वस्तीत आलेले हे सांबर मादी असून तिचे अंदाजे वय ५ ते ६ वर्षे आहे. हे सांबर गौळाणे गावाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलातून भरकटून शहरात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या हे सांबर सुस्थितीत असून त्याच्या डाव्या डोळ्यावर तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू आहेत.

यांनी राबविले रेस्क्यू ऑपरेशन

हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) नाशिक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) नाशिक प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या देखरेखीखाली पार पडले. यामध्ये रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे अभिजीत महाले, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले आदींनी मोलाची भूमिका बजावली. कारवाईस अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार व त्यांची टीम, नाशिक शहर वाहतूक पोलीस तसेच स्थानिक नागरिकांचेही सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news