

नाशिक : कोणतीही कराची थकबाकी नसलेला दाखला घेण्यासाठी महापालिकेत इच्छूकांची झुंबड उडाली आहे. गेल्या आठवडाभरात २२१७ इच्छूकांनी ना हरकत दाखल्यासाठी महापालिकेच्या एक खिडकी योजनेअंतर्गत अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत १९०३ जणांना ना हरकत दाखले उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती उपायुक्त अजित निकत यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासह मनपाकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबत ना - हरकत दाखला सादर करणे अनिवार्य आहे. यासाठी मालमत्ता कर, पाणीपट्टी, जाहीरात व परवाने, नाट्यगृह, जलतरण तलाव, मिळकत, नगरनियोजन, नगरसचिव, अग्निशमन, स्लम, स्थानिक संस्था कर या विभागांचा अभिप्राय बंधनकारक आहे. पूर्वी या सर्व विभागाकडील दाखल्यासाठी उमेदवार अथवा प्रतिनिधींना स्वत; फिरावे लागत असे. ना हरकत दाखला प्राप्त करुन घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तसेच निवडणुकीचा कालावधी कमी असल्याने महापालिकेने यंदा एक खिडकी योजने अंतर्गत ऑनलाईन कार्यप्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे उमेदवारांचा वेळ व खर्चही वाचत आहे. गेल्या आठवडाभरात या प्रणालीद्वारे २२१७ आॉनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १९०३ ना हरकत दाखले उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती उपायुक्त निकत यांनी दिली.
महापालिकेला लाखोंचा महसूल
ना हरकत दाखला मिळवण्यासाठी इच्छूक उमेदवाला मनपाच्या कोणत्याही विभागीय कार्यालयात ६०० रुपयांचा भरणा करावा लागतो. भरणा पावती मिळाल्यानंतर ती ना हरकत दाखल्यासाठी अर्जासोबत जोडावी लागते. त्यानंतरच ना हरकत दाखला उपलब्ध होतो. ना हरकत दाखल्यासाठी महापालिकेकडे आतापर्यंत २२१७ इच्छूक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याद्वारे महापालिकेला १३.३० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.