Fodder Production | नाशिकमध्ये चारा उत्पादनासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन; महिला बचतगटांना मिळणार रोजगाराची संधी

Fodder Production | पशुधनासाठी वर्षभर चाऱ्याची सोय होणार? नाशिक प्रशासनाचा नवा प्रयोग
Fodder
FodderPudhari
Published on: 
Updated on: 

पुढारी विशेष

नामदेव भोर, प्रतिनिधी

जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईवर मात करून पशुधनासाठी वर्षभर चाऱ्याची उपलब्धता निश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी चारा उत्पादक शेतकरी आणि महिला स्वयंसाहाय्यता बचतगटांना शासकीय जमीन तसेच गाळपेरा क्षेत्र चारा उत्पादनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Fodder
Nashik Property Tax | नाशिक महापालिकेला कर्मचारी टंचाईचा फटका; मालमत्ता कराच्या मागणीत 15 कोटींची घट

या जमिनींवर चारा उत्पादन करून त्याला निश्चित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दूध संघ, खासगी दुग्धसंस्था, गोशाळा व्यवस्थापक आणि पशुपालकांची प्रशासनाच्या मध्यस्थीने करार करण्याची संकल्पना पुढे आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, नाशिकचा हा उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठीही पथदर्शी ठरू शकतो.

जिल्ह्यात सध्या जानेवारी २०२७ पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर उद्भवू शकणारी संभाव्य टंचाई टाळण्यासाठी चारा उत्पादन आणि वितरणाची सक्षम साखळी उभारण्यावर भर दिला जात आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादक, पुरवठादार आणि चाऱ्याची गरज असणारे पशुपालक यांच्यात थेट समन्वय निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चाऱ्याची मागणी, उपलब्धता आणि पुरवठा यांचे योग्य नियोजन करून टंचाई काळात पशुधनाला चारा मिळेल, यासाठी दीर्घकालीन व्यवस्था उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

या नियोजनातील महत्त्वाचा भाग म्हणजे शासकीय जमिनींचा चारा उत्पादनासाठी वापर करणे. जिल्ह्यातील उपलब्ध शासकीय जमीन आणि गाळपेरा क्षेत्राचा शोध घेऊन त्यातील लागवडीयोग्य क्षेत्र महिला बचतगटांना तसेच इच्छुक चारा उत्पादकांना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला बचतगटांना या उपक्रमात सहभागी करून घेतल्यास त्यांना उत्पन्नाचे नवे साधनही उपलब्ध होऊ शकते.

बचतगटांचे मोठे जाळे ठरणार उपयुक्त

नाशिक जिल्ह्यात सुमारे ३१ हजार ७८५ महिला स्वयंसाहाय्यता बचतगट कार्यरत आहेत, तर राज्यभरात उमेद अभियानांतर्गत ६ लाख ४० हजार ७१९ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून ९३ हजार १४ महिला बचतगट ग्रामीण भागात कार्यरत आहेत.

या बचतगटांना चारा उत्पादनाच्या उपक्रमाशी जोडल्यास मोठ्या प्रमाणावर ग्रामीण महिलांना रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर शासकीय जमिनींचा उत्पादक वापर होऊन पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याचा दुहेरी उद्देश साध्य होऊ शकतो.

शासकीय जमिनीचा वापर, बाजारपेठेचीही हमी

सध्या चारा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नव्याने या व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्या महिला बचतगटांना अनेकदा उत्पादित चाऱ्याच्या विक्रीची चिंता असते. चारा उत्पादन केल्यानंतर ग्राहक शोधणे, वाहतूक आणि योग्य दर मिळविणे या अडचणींमुळे अनेक जण या व्यवसायाकडे वळत नाहीत.

ही अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाच्या मध्यस्थीने चारा उत्पादक आणि खरेदीदार यांच्यात आधीच समन्वय साधला जाणार आहे. दूध संघ, खासगी दुग्धसंस्था, गोशाळा व्यवस्थापक आणि पशुपालकांची करार करून उत्पादित चाऱ्याची खरेदी निश्चित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे चारा उत्पादकांना बाजारपेठेची हमी मिळण्याबरोबरच पशुपालकांनाही आवश्यकतेनुसार चारा उपलब्ध होण्यास मदत होईल.

Fodder
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

शासकीय जमिनी वापरास मोठी संधी

नाशिक जिल्ह्यात सुमारे २ लाख ७९ हजार ८०० हेक्टर वनक्षेत्र, २ लाख ७०० हेक्टर लागवडीस अयोग्य पडीक जमीन आणि २० हजार ३०० हेक्टर लागवडीयोग्य पडीक जमीन आहे. यापैकी शासकीय मालकीची किंवा प्रत्यक्ष चारा उत्पादनासाठी उपलब्ध होऊ शकते,

अशा जमिनींची पडताळणी करून तिचा चारा उत्पादनासाठी नियोजनबद्ध वापर करण्याचा प्रशासनाचा विचार असून, शक्य त्या ठिकाणी सिंचनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यातही अशा शासकीय जमिनींचा वापर करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.