सिन्नर : सिन्नर पंचायत समिती कार्यालयाच्या २०१४ मध्ये बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीतील दुरुस्तीच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची गंभीर तक्रार विभागीय आयुक्तांकडे दाखल झाली आहे. अर्जदार भाऊसाहेब बैरागी यांनी याबाबत निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे पंचायत समितीच्या इमारतीतील छत, फरशी, दरवाजे, खिडक्या आदी दुरुस्तीसाठी तब्बल १० लाख रुपये खर्च दाखविला. सभापती निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठीही १० लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. विस्तारित इमारत, शेड, बांधकाम विभाग, लेखा विभाग, वित्त विभाग, उपसभापती दालन आदी विभागांच्या दुरुस्तीसाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च दाखविला. या सर्व खर्चाचा एकत्रित आकडा एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्षात इतका खर्च झालाच नसल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे.
या प्रकरणामुळे पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर या तक्रारीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
आंदोलन छेडण्याचा इशारा
बैरागी यांच्या तक्रारीनुसार, १९७६ व १९८६ च्या जुन्या इमारतीचा दाखला देत नव्या इमारतीतील दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वैरागी यांनी दिला आहे.
अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आलेले आहे. मोजमाप पुस्तकात जेवढे काम केलेले आहे, तेवढेच नोंदवण्यात आलेले आहे. राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याकडून कामाची संपूर्ण तपासणी केलेली असून, त्यांचा अहवाल समाधानकारक आहे. दोषदायित्व कालावधी (डीएलबी) एक वर्ष शिल्लक आहे. जर काही काम खराब अथवा अपूर्ण असेल तर ठेकेदाराची अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.
अनिल पाटील, उपविभागीय अभियंता इ. व द.