

नाशिक : येथून दिल्लीला जाण्यासाठी आता दिवसातून दोन विमान उड्डाणे होणार आहेत. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून मंत्री, अधिकारी यांच्या भेटी घेऊन नाशिक-दिल्ली विमानसेवा नागरी उड्डाण कंपन्यांसाठी कशा फायदेशीर ठरू शकतात, हे पटवून दिले होते. गेल्या 21 ऑगस्ट रोजी संसदेच्या अधिवेशन काळात लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातूनदेखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
ओझर विमानताळावरून सध्या नाशिकसाठी एकच फ्लाइट असून, ते सकाळच्या सुमारास नाशिकहून दिल्लीकडे उड्डाण घेते. आता सायंकाळी दिल्ली येथून सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी नाशिकसाठी उड्डाण घेईल.
यामुळे व्यापारी, उद्योजक, शासकीय अधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी यांची मोठी सोय होणार असून, पर्यटकांच्या द़ृष्टिकोनातूनदेखील ही वेळ योग्य आहे. खासदार वाजे यांनी नाशिकहून दिल्ली तसेच इतर ठिकाणी सुरू असलेल्या विमान उड्डाणातील वाढत्या प्रवासी संख्येची आकडेवारी वरिष्ठ स्तरावर प्रस्तुत करून मागणीच्या अनुषंगाने अधिकच्या उड्डाणाचा पुरवठा करणे किती आवश्यक आहे हे पटवून दिल्यामुळे याबाबत नागरी उड्डाण मंत्रालय व नागरी उड्डाण कंपन्यांनी या सेवेसाठी सकारात्मकता दर्शवली होती.
नाशिक-दिल्ली नवीन विमानसेवा सुरू केल्याबद्दल नागरी उड्डाण मंत्रालय तसेच इंडिगो एअरलाइनचे आभार. या सेवेलाही नाशिककर भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी करतील असा माझा विश्वास आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार