

नाशिक ( जानोरी, ता. दिंडोरी ) : विमानतळ समोरील जानोरी गावातील गट नंबर 1097 मधील तत्त्व सप्लिमेंट्स प्रा. लि. या कंपनीने अनधिकृत बांधकाम करून शेजारील नैसर्गिक नाला बुजवल्यामुळे गट नंबर 1095 मधील शेतकरी मंजुळा नामदेव कोरडे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अतीवृष्टीमुळे नाल्याचे पाणी थेट शेतात शिरले आणि अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गट नंबर 1095 मध्ये मी व माझा मुलगा शेतीकाम करतो. शेवंती फुलाचे पीक लावले होते. परंतु कंपनीच्या अनधिकृत बांधकामामुळे आणि नाल्याची दिशा बदलल्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात शिरले आणि पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची आणि संबंधित कंपनीवर कठोर कारवाई व्हावी.
मंजुळा कोरडे, शेतकरी.
सदर कंपनीला ग्रामपंचायतीने याआधीही अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिली होती. मात्र, कंपनी मालकाने ती दुर्लक्षित केली. आता ग्रामपंचायतीमार्फत तहसीलदारांना कारवाईसाठी पत्र देण्यात येणार आहे.
नानाभाऊ खांडेकर , ग्रामविकास अधिकारी.
कंपनीच्या अनधिकृत बांधकामामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, याविरोधात तातडीने कडक कारवाई व्हावी.
सुभाष नेहेरे, जानोरीचे सरपंच.
पावसाच्या पाण्यामुळे नाशिक विमानतळ रस्त्यावरही वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. दोन ते तीन तास रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.