

पुढारी ऑनलाइन डेस्क | भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने नाशिकध्ये क्रिकेटप्रेमींनी काल रात्री विजयी जल्लोष साजरा केला. या दरम्यान, फटाक्यांची आतषबाजी केल्याने शहरातील बी.वाय. के कॉलेजच्या आवारात मोठी आग लागली. या आगीने मोठे रौद्ररुप धारण केले होते. अग्निशमन दलाने तत्काळ ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
भारतीय संघाच्या विजयाचा आनंदोत्सव काल जगभरातील भारतीयांनी साजरा केला. नाशिकमध्येही वेगवेगळ्या भागात तरुणाईने फटाके फोडत व घोषणा देत विजयी जल्लोष केला. नाशिकच्या बी.वाय. के कॉलेजच्या आवारात मात्र, या दरम्यान फटाक्यांची आतषबाजी वेळी ठिणगी पडून आग लागली. यावेळी याठिकाणी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवताना बघ्यांची मोठी गर्दी जमा झाल्याने आग विझवण्यात आडथळे निर्माण झाले होते. पोलिसांनी यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांना परिसरातून हकलले. या आगीत काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.