

नाशिक : गौरव अहिरे
राज्यात कारागृह प्रशासनाकडील 31 तुरुंगांत स्वमालकीची शेतजमीन आहे. या शेतीत कैद्यांसाठी लागणारा निरनिराळा भाजीपाला, कडधान्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. 2023-24 या आर्थिक वर्षात 330.88 हेक्टर क्षेत्रात शेती उत्पादनातून कारागृह प्रशासनाने 4 कोटी 55 लाख 53 हजार 890 रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यातून वर्षभरात कारागृहास 1 कोटी 89 लाख 84 हजार 780 रुपयांचा नफा झाला. प्रशासनाने सरासरी दर हेक्टरी 1 लाख 37 हजार 675 रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
राज्यात 9 मध्यवर्ती कारागृह, 29 जिल्हा कारागृह, विशेष कारागृह, महिला कारागृह व किशोर सुधारालय असे प्रत्येकी 1, तसेच 19 खुले कारागृह व 1 खुली वसाहत अशी 60 कारागृहे आहेत. त्यात 27 हजार 110 कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे 35 हजारहून जास्त कैदी आहेत. त्यामुळे कारागृहांमधील कैद्यांना काम देण्यासाठी व त्यांच्या भोजनात भाजीपाल्याची व्यवस्था करण्यासाठी 29 कारागृहांच्या मालकीच्या शेतजमिनींचा वापर केला जातो.
शेतात कैद्यांना काम करण्यास सांगत शेतीतून पिके घेतली जातात. हा भाजीपाला कारागृहातील कैद्यांना पुरवला जातो. त्यामुळे कैद्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय भाजीपाला मिळण्यास मदत होते. कारागृहाच्या शेतांमध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात फळभाज्या, पालेभाज्यांसह कडधान्य, इतर पिके घेतली जातात. तसेच काही कारागृहांमध्ये केळी, उसाचेही उत्पादन घेतले जाते.
राज्यातील काही कारागृहांमध्ये मत्स्यपालन उद्योेग, मशरूम उत्पादन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त रोपवाटिकाही विकसित केल्या आहेत. तर सुमारे 10 कारागृहांमध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या अनुदानातून कारागृहांच्या आतील परिसरात चंदन वृक्षांची लागवड केली आहे. शेतीसाठी कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कैद्यांचा वापर केला जातो व त्यांना आर्थिक मोबदलाही दिला जातो.
कारागृहांकडील शेती क्षेत्रापैकी सुमारे 186 हेक्टर बागायती तर 142 हेक्टर क्षेत्र जिरायती आहे. तसेच इतर क्षेत्र वनीकरण आणि पडीक क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे इतर सुमारे 230 हेक्टर क्षेत्रफळात कारागृहाच्या इमारती, निवासस्थाने, अंतर्गत रस्ते, कार्यालये, मैदाने, बाजारपेठ, स्मशानभूमी, सैन्य दलास कराराने दिलेल्या जमिनी, सामाजिक न्याय विभागास जागा दिल्या आहेत.
कारागृहात शेती करण्यासाठी प्रशासनाकडे 28 ट्रॅक्टर, 111 बैल, भाजीपाला व अन्नधान्य वाहतुकीसाठी वाहने, शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी 118 विद्युत मोटरी, 3 ऑईल इंजिन्स आहेत. तसेच पीक संरक्षणासाठी स्प्रे पंप, डस्टर पंप व इतर अवजारे आहेत. त्यामुळे आधुनिक व पारंपरिक अवजारे पद्धतींचा वापर करीत कारागृह शेती बहरत आहे.