

सिडको (नाशिक) : अंबड, सातपूर, राजुर बहुला, आडवन, पारदेवी या गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत याच्या समवेत मुंबईत मंत्रालयात बुधवार (दि. 6 ऑगस्ट) रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी आमदार बच्चु कडू यांनी थेट सावंत यांना फोन करत बैठक घेण्याची केलेली विनंती सावंत यांना करताच ती मान्य केली.
माजी आमदार बच्चू कडू शनिवारी (दि.26) नाशिकमध्ये असताना प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेत एमआयडीसी भूसंपादनाला विरोध दर्शवला.
शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना एमआयडीसीने प्रस्तावित केलेल्या भूसंपादनामुळे त्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी तत्काळ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. सामंत यांनी याप्रकरणी ६ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित केली. बैठकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, उद्योग अधिकारी आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये साहेबराव दातीर, शांताराम फडोळ, ज्ञानेश्वर कोकणे, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर चौधरी आणि सुरेश कोकणे आदी उपस्थित होते.