

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महत्त्वपूर्ण कारवाई करत विशेष पीएमएलए न्यायालयात तीन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांचा सविस्तर आढावा देण्यात आला असून, त्याच्या मालमत्ता, बँक व्यवहार आणि कथित गुन्हेगारी उत्पन्नाबाबत विविध मुद्दे मांडण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे अशोक खरात याच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, प्रकरणाने पुन्हा एकदा राज्यभर लक्ष वेधले आहे.
ईडीच्या तपासानुसार, अशोक खरात याने मंत्र-तंत्र, धार्मिक विधी आणि विविध आमिषांच्या माध्यमातून अनेक भक्तांची फसवणूक करून सुमारे ४२.८८ कोटी रुपयांचे कथित गुन्हेगारी उत्पन्न मिळविल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ विविध आर्थिक व्यवहार, बँक नोंदी आणि दस्तऐवजी पुरावे न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती आहे.
आरोपपत्रात खरात याने बनावट पद्धतीने १४२ बँक खाती उघडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यासंबंधीचा तपशील ईडीने न्यायालयासमोर मांडला आहे. तसेच खरात याच्या पत्नीचाही आरोपपत्रात उल्लेख असून, आर्थिक व्यवहारांशी संबंधित विविध बाबींची नोंद करण्यात आली आहे. ईडीने विशेषतः खरात याच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत त्याच्या उत्पन्नाचे स्रोत, मालमत्ता खरेदी आणि निधीच्या वापराची सखोल चौकशी केली आहे.
ईडीच्या तपासादरम्यान आतापर्यंत १९.२० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय छापेमारीदरम्यान १७.७० कोटी रुपयांची रोकड, बँक ठेवी, विदेशी चलन, सोने-चांदीचे दागिने तसेच मर्सिडीज कार जप्त करण्यात आल्याची नोंद आरोपपत्रात आहे. या जप्तीमुळे खरात याच्या कथित आर्थिक व्यवहारांचा व्यापक तपशील समोर आला आहे.
अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आले ते त्याच्या विरोधातील फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मंत्र-तंत्राच्या नावाखाली विविध महिलांना व इतर व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. तसेच महिलांच्या वैयक्तिक अडचणी आणि मानसिक स्थितीचा गैरफायदा घेत त्यांचे कथित लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणातील काही कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली होती.
या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान खरात याच्या कथित आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आल्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे मनी लाँड्रिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला. दीर्घकालीन तपास, आर्थिक कागदपत्रांची पडताळणी, बँक व्यवहारांचे विश्लेषण आणि विविध ठिकाणी छापेमारी केल्यानंतर अखेर विशेष पीएमएलए न्यायालयात तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामुळे प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.