

नाशिक : कंपनीमध्ये अवैध बांधकाम केल्याची तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात व कंपनी सुरू ठेवण्यासाठी मालकाकडे ६० लाख रुपयांची खंडणी मागून दीड लाखाची खंडणी घेणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष प्यारेलाल शर्मा, शशी राजपूत, रोहित म्हस्के व कैलास दवंडे अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र धोंडू कोठावदे (रा. खुटवडनगर) यांची कंपनी आहे. आरोपी संतोष प्यारेलाल शर्मा (रा. देवळाली कॅम्प) याने सातपूर एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करत फिर्यादीच्या कंपनीत अवैध बांधकाम केल्याची खोटी तक्रार एमआयडीसी कार्यालयात केली होती. ती मागे घेण्याच्या मोबदल्यात आणि कंपनी सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्ता द्यावा लागेल. नाही तर मारून टाकेन, अशी धमकी शर्माने फिर्यादी कोठावदे यांनी दिली होती. फिर्यादीची जनमानसातील प्रतिमा मलिन व्हावी यासाठी सोशल मीडियावर फिर्यादीच्या नावाचा व्हिडिओ अपलोड करत त्यांची बदनामी केली. आरोपी शर्मासह त्याचे साथीदार शशी राजपूत, रोहित म्हस्के व कैलास दवंडे यांनी फिर्यादीच्या कंपनीच्या गेटवर विनापरवाना अनधिकृत पोस्टर लावून कंपनी बंद पाडतो. तुमचा माज जिरवतो.
कंपनी सुरू ठेवायची असेल, तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देऊन धक्काबुक्की करत कामगारांत दहशत निर्माण केली. फिर्यादी सायंकाळी एमआयडीसीतून घरी जात असताना आरोपींनी प्रणय स्टम्पिंग कंपनीजवळ कामटवाडे रस्त्यावर फिर्यादीची गाडी अडवून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून दीड लाख रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारले. हा प्रकार ३० ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान घडला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संतोष शर्मासह इतर चार जणांविरुद्ध खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड अधिक तपास करीत आहेत.