

सिडको (नाशिक) : अवैध बांधकामाची खोटी तक्रार दाखल करून उद्योजकाला धमकी देत सहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी संतोष शर्मा याच्यासह तिघांवर अंबड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीकडून दीड लाख रुपये बळजबरीने वसूल केल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र धोंडु कोठावदे (वय ५९, रा. खुटवडनगर) यांची कंपनी औद्योगिक वसाहतीत आहे. संशयित संतोष शर्मा, शशी राजपूत, रोहित म्हस्के आणि कैलास दवंडे यांच्यासह काही जणांनी त्यांच्या कंपनीवर अवैध बांधकाम केल्याची खोटी तक्रार एमआयडीसी कार्यालयात दाखल केली. तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात तसेच कंपनी चालू ठेवण्यासाठी ‘दरमहा हप्ता’ देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा जीव घेण्याची धमकीही दिली.
संशयितांनी फिर्यादींचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी केली. तसेच कंपनीच्या गेटवर विनापरवाना पोस्टर लावून “कंपनी बंद पाडू”, “माज जिरवू”, असे धमकीचे संदेश झळकावले. इतकेच नव्हे तर फिर्यादींना रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देत सहा लाखांची खंडणी मागण्यात आली आणि त्यापैकी दीड लाख रुपये जबरदस्तीने घेतल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड अधिक तपास करीत आहेत.