

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागलेल्या नाशिककरांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानात कमालीची घट झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरत आहे. किमान तापमान १४ अंशांवर घसरल्याने सकाळच्या सुमारास थंड वातावरण अनुभवास मिळत आहे.
याशिवाय दिवसभर वातावरणामध्ये काहीसा गारवा जाणवत असल्याने हिवाळ्याचे सुखद वातावरण सध्या निर्माण होत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नाशिककरांना असह्य उकाडा आणि तापत्या उन्हाचा सामना करावा लागला. मात्र, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात हवेत गारवा वाढू लागल्याने नागरिकांना थंडीची जाणीव होऊ लागली आहे.
किमान तापमानात मोठी घट झाल्याने सकाळसह दिवसभर वातावरणामध्ये थंडावा जाणवत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. विशेषतः निफाड आणि परिसरातील शेतशिवारात सकाळी आणि रात्रीच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत आहे.
हिवाळ्यात सकाळी व्यायाम करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यानुसार, सकाळच्या वेळी शहरातील जॉगिंग ट्रॅक नाशिककरांच्या गर्दीने फुलू लागली आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात सध्या कोरडे वातावरण निर्माण झाल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळी तुलनेने गारवा निर्माण झाला आहे.
याशिवाय नाशिकला हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्याने पुढील काही दिवसांत शहरासह ग्रामीण भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या सोमवारपासून कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे.
सोमवारी (दि. २६) नाशिकचे किमान तापमान १६.२ अंश सेल्सिअसइतके नोंदवले गेले. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मंगळवारी (दि. २७) किमान तापमान बदल झाला नसला तरी, कमाल तापमान थेट ३३.७ अंश सेल्सिअसइतके नोंदवले गेले. मंगळवारी (दि. २८) मात्र किमान तापमानात कमालीची घट नोंदवली गेली. कमाल तापमानही थेट ३३ अंश सेल्सिअसवर आले आहे.