नाशिक : पाणवेलीप्रश्नी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले

नाशिक : पाणवेलीप्रश्नी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले

नाशिक : आनंद बोरा
नाशिकपासून नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत नदीपात्र पाणवेलीने भरल्याने, गोदावरीचा श्वास गुदमरत आहे. यामुळे जलप्रदूषणाबरोबरच इतरही समस्या निर्माण होत असून, अभयारण्यात वावरणारे पक्षी तसेच इतर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याविरोधात जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले असून, पाणवेलीप्रश्नी गंभीर भूमिका घ्या अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

गोदावरीतील पाणवेलीप्रश्नी यापूर्वीदेखील पर्यावरणप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेतली गेली. मात्र, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने, पाणवेलीचा प्रश्न जैसे थे आहे. नाशिक शहरालाच नव्हे, तर नांदूरमध्यमेश्वरपर्यंतची जैवविविधता पाणवेलीमुळे धोक्यात आली आहे. अभयारण्यातील पक्ष्यांच्या आरोग्यावर या पाणवेलीचा परिणाम होत असून, अभयारण्यातून पक्षी इतरत्र निवारा शोधत आहेत. देशी-विदेशी पक्षी वेळेआधीच परतीच्या मार्गावर निघाल्याने, हा एकप्रकारे धोक्याचा इशाराच आहे. दरम्यान, यावरून पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले असून, पाणवेली काढा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा पर्यावरणप्रेमींकडून घेतला जाणार आहे.

गोदावरीच्या पात्रात सांडपाणी आणि केमिकल मिश्रित पाणी सोडले जात असल्याने पाणवेली वाढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरच्या धर्तीवर हर्बल फवारणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच इतर उपाययोजनांबाबतही आदेश दिले होते. परंतु ढिम्म प्रशासनामुळे पाणवेली फोफावत आहेत. – भारती जाधव, पर्यावरणप्रेमी

गोदावरीत पाणी कमी अन् पानवेलीचा गालिचा अधिक प्रमाणात दिसतो. महापालिकेकडून पाणवेली काढण्याबाबतचे ठेके दिले जातात. परंतु या ठेक्यांना वेगळाच 'अर्थ' प्राप्त होत असल्याने, पाणवेलीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. नाशिककरांनीच आता प्रशासनाविरोधात भूमिका घेऊन गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. – अमित कुलकर्णी, अध्यक्ष, निसर्गसेवक युवा मंच

जलपर्णीमुळे पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात आली असून, पाण्यातील जैवसाखळी नष्ट होत आहे. जलपर्णी जलचरांसाठीच नव्हे, तर मानवी आरोग्यासाठीदेखील अपायकारक असून, शास्त्रीयदृष्टीने अभ्यास करून तिचा नायनाट करणे गरजेचे आहे. अन्यथा याचे दुष्परिणाम आपणा सर्वांनाच भोगावे लागतील. – तुषार पिंगळे, निसर्गमित्र, नाशिक

पाणवेलीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असून, नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्याचे नमुने तत्काळ तपासण्याची गरज आहे. कारण धरणातील पक्ष्यांचे खाद्य कमी झाले असून, पक्षी इतरत्र निवारा शोधत आहेत. अनेक पक्ष्यांनी अभयारण्य सोडल्याने ही बाब चिंताजनक आहे. – दत्ता उगावकर, ज्येष्ठ पक्षिमित्र

गटारीच्या पाण्यात नायट्रोजन असतो. तो पाणवेलीसाठी पोषक असतो. गटारीचे पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाणवेलींचा आवाका वाढत आहे. आम्ही सांडपाण्याच्या गटारीविरोधात सातत्याने भांडत आहोत. मात्र, प्रशासन उदासीन आहे. सध्या गोदावरी आरतीच्या निधीवरून वाद सुरू आहे. मात्र, दुर्दैवाने सांगावेसे वाटते की, हा निधी गटारीसाठी दिला जात आहे. – निशिकांत पगारे, अध्यक्ष, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच

सध्या गोदावरीची पाणीपातळी घटल्यामुळे पाणवेली काढणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून या पाणवेली काढाव्यात. पाणवेलीपासून बायो-इथेनॉलची निर्मिती करणे शक्य असल्याने प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा. – डॉ. सीमा पाटील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news