

नाशिक : सतीश डोंगरे
देशात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कॉम्प्युटिंग, फिनटेक, ई-कॉमर्स आणि डिजिटल सेवांचा झपाट्याने विस्तार होत असताना डेटा सेंटर उद्योगाची मागणीही वेगाने वाढत आहे. आतापर्यंत नवी मुंबई, ठाणे आणि पुणे ही या क्षेत्रातील प्रमुख केंद्रे मानली जात असली, तरी आता नाशिकही या शर्यतीत वेगाने पुढे येत आहे.
३४० लहान-मोठ्या आयटी कंपन्या असलेल्या नाशिकमध्ये २६ आयटी कंपन्या डेटा सेंटर उभारण्यास उत्सुक असून, लुमिव्हर्स सोल्यूशन प्रा. लि. आणि महिंद्रा आयटी पार्क यांच्यावतीने डेटा सेंटरमध्ये पुढील पाच वर्षांत तब्बल २०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
एमआयडीसीकडून रांजूर बहुला येथे आयटी पार्कसाठी उपलब्ध करून दिलेली २५ एकर जागा, महावितरणकडून डिसेंबर २०२६ पर्यंत उभारले जाणारे ४०० केव्ही सबस्टेशन, 'निमा'तर्फे ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या राज्यव्यापी 'आयटी कॉन्क्लेव्ह', डेटा सेंटरसाठी आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या लेग्रंडसारख्या जागतिक कंपनीची नाशिकमधील गुंतवणूक, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उभारले जाणारे इन्फ्रास्ट्रक्चर, याशिवाय फायबर बॅकबोन आणि मल्टिपल नेटवर्क कनेक्टिव्हिटीची क्षमता नाशिकला डेटा सेंटरच्या शर्यतीत घेऊन जाणारे ठरत आहे.
जमेची बाब म्हणजे नाशिक आयटी असोसिएशन अर्थात 'निटा'कडे दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरूसह देशातील अन्य शहरांमधील २६ नामांकित कंपन्या नाशिकमध्ये डेटा सेंटर उभारण्यास उत्सुक असून, पुढील सहा महिन्यांत या कंपन्यांकडून गुंतवणूक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच लुमिव्हर्स सोल्यूशन प्रा. लि. आणि महिंद्रा आयटी पार्क यांच्यावतीने डेटा सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात ३० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांत ही गुंतवणूक २०० कोटींपर्यंत नेली जाणार आहे.
३४० आयटी कंपन्या नाशिकमध्ये झाले
२६ कंपन्या डेटा सेंटर उभारण्यास उत्सुक
भारतातील डेटा सेंटर क्षमतेतील महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६० ते ६६ टक्के.
महाराष्ट्रात सध्या अंदाजे १ गिगावॅट डेटा सेंटर क्षमता.
२०२३ पर्यंत ५ गिगावॅटपेक्षा अधिक डेटा सेंटर क्षमता करण्याचे उद्दिष्ट.
राज्याच्या ग्रीन डेटा सेंटर धोरणामुळे मुंबई बाहेरील शहरांना डेटा सेंटर गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी.
महाराष्ट्रातील सध्याची प्रमुख केंद्रे नवी मुंबई, ठाणे, पुणे.
मुंबई-आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे.
सातपूर, अंबड, सिन्नर, गोंदे, दिंडोरीसह एमआयडीसीचे नेटवर्क.
मुंबईच्या तुलनेत जमीन स्वस्त आणि विस्तारासाठी उपलब्ध.
तुलनेने कमी तापमानामुळे कूलिंग खर्चात संभाव्य बचत.
नाशिकमध्ये ३४० आयटी कंपन्यांचे जाळे, २२ अभियांत्रिकी महाविद्यालये.
टीसीएस, डब्ल्यूपीएन, इएसडीएस, लुमिव्हर्स सारख्या कंपन्यांचे डेटा सेंटर.
राज्य सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरणाला गती दिल्यानंतर मुंबईबाहेरील शहरांकडेही उद्योग क्षेत्राचे लक्ष वेधले जात आहे. तुलनेने कमी जमीनदर, मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि मुंबईशी जवळीक यामुळे नाशिकचा पर्याय गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे.
रांजूर बहुला येथील प्रस्तावित आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या, डिजिटल सेवा उद्योग तसेच डेटा सेंटरसारख्या उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांकडून चाचपणी सुरू आहे. डेटा सेंटरसाठी आवश्यक इलेक्ट्रिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उपकरणांच्या निर्मितीत असलेल्या लेग्रंड कंपनीने नाशिकमध्ये उत्पादन क्षमता उभारल्याने डेटा सेंटरला बळ मिळाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील २२ अभियांत्रिकी महाविद्यालये कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम करीत असल्याने, देशभरातील आयटी कंपन्यांना नाशिक खुणावत आहे.
डेटा सेंटरसाठी नाशिक सर्वोत्तम पर्याय असल्याने, सरकारने वीज आणि भूखंडांवर पुरेशी सबसिडी उपलब्ध करून द्यायला हवी. सद्यस्थितीत देशभरातील २६ आयटी कंपन्यांशी चर्चा सुरू असून, पुढील सहा महिन्यांत या कंपन्यांकडून सकारात्मक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. याशिवाय विदेशी आयटी कंपन्या अहमदाबादऐवजी नाशिकमध्ये सेकंड ऑफिस सुरू करण्यास उत्सुक आहेत.
- अमर ठाकरे, अध्यक्ष, निटा
नाशिक डेटा बेस व्हावे यासाठी 'निमा'च्या वतीने देशव्यापी आयटी कॉन्क्लेव्ह आयोजन केले जाणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये देशभरातील दोनशेपेक्षा अधिक शिष्टमंडळ या कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित राहणार आहेत. ही कॉन्क्लेव्ह नाशिकला डेटा सेंटर हब करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
- आशिष नहार, अध्यक्ष, निमा