

नाशिक : द्वारका सर्कल येथे अंडरपास विकसित करताना सर्व तांत्रिक बाबींचा सखोल आणि काटेकोर अभ्यास करावा तसेच कोणतीही त्रुटी राहू नये, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी वाहतूक पोलिसांना विशेष प्रशिक्षण द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळातर्फे अंडरपासची निर्मिती करण्यात येणार आहे. या संदर्भात मंत्री भुजबळ यांनी सोमवारी (दि. २१) द्वारका सर्कल येथे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. विकसित करण्यात येणाऱ्या अंडरपासची माहिती घेत त्यांनी याठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यात प्रामुख्याने द्वारका सर्कल नाशिकहून नाशिकरोडकडे जाताना ८०० मीटरचा अंडरपास तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील हलकी वाहने ये- जा करू शकतील. या मुख्य अंडरपास मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूकदेखील जोडली जाणार आहे. यासाठी वडाळा नाका येथे ३०० मीटरचा दुसरा अंडरपास विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होईल, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, नाशिक महानगरपालिका वाहतूक सेलचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजूरकर, आकाश पगार, पांडुरंग राऊत, अमर वझरे आदी उपस्थित होते.