

नाशिक : नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने किल्ले वाचवा अभियान राबविण्यात आले. दुर्गसेवकांनी स्वतः महाराजांच्या मावळ्यांची वेशभूषा करुन नाशिक शहरातील महाविद्यालयीन व चित्रपट गृह परिसरात किल्ले वाचवा त्यांचे संवर्धन करा असे आवाहन केले.
यावेळी दुर्गसेवकांनी हातात पोस्टर घेऊन दुर्लक्षित व पडझड झालेले "किल्ले वाचले तरच शिवरायांचा खराखुरा इतिहास वाचेल असा संदेश देण्यात आला.
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्गसंवर्धन क्षेत्रातील अभ्यासक राम खुर्दळ यांच्या मार्गदर्शनाखाली "शिवजन्मोत्सवाला किल्ले वाचवा" हे अभियान राबवण्यात येत आहे. याचा मूळ हेतू डोळ्यावर पट्टी बांधून असलेला समाज, सरकार, प्रशासनाला भान यावे, छत्रपती शिवरायांची खरीखुरी स्मारक सह्याद्रीतील गडकिल्ले वाचवण्यासाठी जागृती व्हावी यासाठीच हे अभियान करण्यात येत आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील ६० हुन अधिक गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक ठेवा जो अतिशय दूरवस्थेत आहे, त्याचे संगोपण व्हावे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान कायम असेल, समाजातील सर्वांना गडकोट व त्यांचे अस्तित्व वाचवण्याच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या २५ वर्षाच्या २०४ मोहिमांच्या अनुभवाचा सहवास मिळावा, अधिक लोकांनी यात जोडलं जावं हा यामागे हेतू आहे.
महाराजांच्या पाऊलखुणा असलेले गड किल्ले उद्धवस्त होत असताना आता केवळ गडासाठी पुढं यां...असा संदेश पोस्टर द्वारे हे मावळे करणार आहेत. या मोहिमेत शिवकार्य गडकोटचे भुषण औटे, यासह दत्ताजी कांबळे, विनायक पवार, दौलत महालेयशश्री भोये, यश तावडे, सचिन शिंदे, गायत्री कोतवाल,श्रुती गायकवाड, आकाश पाटील हे दुर्गसेवक सहभागी आहेत, हे अभियान निरंतर असणार आहे.