

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रब्बी हंगामातील पेरण्यांनी नीचांकी पातळी गाठली आहे. पावसाने दिलेली ओढ, धरणे व विहिरींतील घटता जलसाठा आणि जमिनीतील कमी झालेला ओलावा यांमुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. नोव्हेंबरचा तिसरा आठवडा उजाडला तरी जिल्ह्यात अवघ्या १७ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून, त्याचा थेट परिणाम शेतीकामांवर झाला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या मुख्य पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. विशेषतः रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या गव्हाची केवळ ८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरच (सुमारे १३.५२ टक्के) पेरणी होऊ शकली आहे. जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात सर्वात कमी पेरण्या झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी सरासरी १ लाख ४० हजार ०१५ हेक्टर निश्चित केले असून, यापैकी आतापर्यंत १९ हजार १७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात ज्वारीसाठी ४ हजार २२० हेक्टर क्षेत्र असून, यातील १ हजार १२० हेक्टर ज्वारीची पेरणी झाली आहे.
प्रमुख पीक असलेल्या गव्हासाठी ६४ हजार २३३ हेक्टर निश्चित केले आहे. त्यापैकी ८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. मका ३ हजार १३७ हेक्टर, हरभरा ५ हजार ७१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
खतसाठा पडून
पेरण्यांचा वेग मंदावल्याने बाजारातील खतांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, जिल्ह्यात मोठा खतसाठा पडून असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्याची उपलब्धता लक्षात घेता शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तालुकानिहाय पेरण्या
बागलाण (८.०८ टक्के)
चांदवड (१८.३९ टक्के)
देवळा (८.६६ टक्के)
दिंडोरी (१६.३७ टक्के)
इगतपुरी (१०.०७ टक्के)
कळवण (१५.५९ टक्के)
मालेगाव (१२.५० टक्के)
नांदगाव (५.०३ टक्के)
नाशिक (१७.४४ टक्के)
निफाड (१६.५१ टक्के)
पेठ (१०.२२ टक्के)
सिन्नर (३७.११ टक्के)
सुरगाणा (१४.३६ टक्के)
त्र्यंबकेश्वर (८ टक्के)
येवला (६ टक्के)