

मनमाड : पुढारी वृत्तसेवा
यंदा नोव्हेंबर महिन्यातच निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईचा फटका इतर घटकांप्रमाणे पोल्ट्री फार्म व्यवसायालाही बसत आहे. मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील अनेक पोल्ट्री फार्म बंद झाले, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दुष्काळामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला असून, वेगाने पोल्ट्री फार्म बंद पडत असल्याने आगामी काळात चिकनची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब पिकांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा आता पोल्ट्री फॉर्म्ससाठीही ओळखला जात आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचे पाहून अनेक सुशिक्षित तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत. अनेकांनी बँकेकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेती करणे बेभरवशाचे झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन सुरू केले आहे. मनमाड परिसरासह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत पोल्ट्री व्यवसाय जोरात आहे. ठिकठिकाणी पोल्ट्री शेड असून, पोल्ट्री फार्मधारक वेगवेगळ्या कंपन्यांकडून कोंबडीचे पिल्लू घेऊन त्याचे पालनपोषण करतात. ४५ दिवसांत कोंबडी तयार झाल्यानंतर या कोंबड्या कंपन्यांना दिल्या जातात.
पोल्ट्री फार्मसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ४० टक्के पोल्ट्री फार्मधारकांनी कोंबड्यांच्या पिल्लांची नवीन बॅच टाकणे बंद केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री आकडेवारी
नाशिक जिल्ह्यात पोल्ट्री फार्मची संख्या : १ हजार ८६२
पोल्ट्री फार्ममध्ये एका बॅचमध्ये निघणारी कोंबड्यांची संख्या : ४ लाख ८६ हजार ८०३
एका वर्षात निघणाऱ्या बॅचेस : सुमारे ५ बॅचेस
"माझे पोल्ट्री फार्मचे तीन शेड असून, प्रत्येक शेडमध्ये ५ हजार पक्षी टाकत होतो. यंदा तर नोव्हेंबर महिन्यात विहिरी कोरड्या पडल्यामुळे एकाही शेडमध्ये पक्षी टाकले नाहीत. पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. दुष्काळामुळे कर्ज कसे फेडायचे याची चिंता आहे. सरकारने पोल्ट्रीधारकांनाही मदत करावी."
— सागर खताळ, पोल्ट्री फार्मधारक