

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदारयादी सोमवारी (दि. ३१) प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५१ लाख ४ हजार ४५८ मतदारांपैकी ४० लाख ७४ हजार २१४ मतदारांच्या गणना अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुमारे १० लाख ३० हजार अर्ज अद्याप डिजिटायझेशन प्रक्रियेत आलेले नाहीत. परिणामी, या मतदारांची नावे प्रारूप यादीत असतील की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
एसआयआर प्रक्रियेत जिल्ह्यातील सुमारे ७९.८२ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित २०.१८ टक्के म्हणजेच सुमारे १०.३० लाख अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे या मतदारांच्या नावांबाबत प्रारूप यादीत काय स्थिती राहणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
मात्र, अर्ज डिजिटायझेशन न झाल्याने संबंधित मतदाराचे नाव कायमचे मतदारयादीतून वगळले जाईल, असा अर्थ काढणे चुकीचे ठरणार आहे. घर बंद असणे, मतदार स्थलांतरित होणे, मतदार उपलब्ध न होणे, मृत्यू किंवा अन्य कारणांमुळे गणना अर्ज उपलब्ध न होणे, अशी विविध कारणे यामागे असू शकतात.
दरम्यान, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २०२५ च्या मतदारयादीत नाव असलेल्या; मात्र २०२६ च्या प्रारूप यादीत नाव नसलेल्या मतदारांची स्वतंत्र यादीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात प्रत्यक्षात किती मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली गेली आहेत, याचे स्पष्ट चित्र ३१ ऑगस्टनंतर समोर येणार आहे.
जिल्ह्यात ३१ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर दि. ३० सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यामुळे प्रारूप यादीत नाव नसलेल्या मतदारांना आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी संधी मिळणार आहे. त्यानंतर दावे-हरकतींची छाननी, सुनावणी आणि निर्णयाची प्रक्रिया होऊन दि. ४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.