

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभागात सध्या पशुधनासाठी सुमारे पाच महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, पावसाला होत असलेला विलंब, वाढती पाणीटंचाई आणि काही भागांतील चारा पाण्याचा तुटवडा यामुळे शेतकरी व पशुपालकांची चिंता अद्याप कायम आहे. नाशिक विभागात सध्या एक कोटी १९ लाख मेट्रिक टनांहून अधिक चारा शिल्लक असून, तो सुमारे पाच महिने पुरेल इतकाच असल्याची माहिती प्रशासनाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
त्यामुळे सध्या विभागात चाऱ्याचे तातडीचे संकट नसले, तरी पाऊस उशिरा होण्याचे संकेत असल्यामुळे चारा व पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विभागात एकूण ८१ लाख ८१ हजार ६७० लहान - मोठी जनावरे असून, त्यांना दरमहा सुमारे १९ लाख ७६ हजार ८५ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासते. यंदाच्या खरीप हंगामात ४४ लाख १४ हजार ५६४ मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे सध्याच्या स्थितीत पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याचा साठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पाहाता, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक चारा उपलब्ध असून, त्या ठिकाणी सुमारे ८३ लाख ६५ हजार १३९ मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. धुळे जिल्ह्यातही १७ लाख ४३ हजार ६८० मेट्रिक टन चाऱ्याचा साठा उपलब्ध आहे. दुसरीकडे, नाशिक विभागातील अनेक भागांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.
येवला, मालेगाव, इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. काही ग्रामीण भागांत चारा व पाण्याची कमतरता जाणवत असल्याने पशुपालकांकडून चारा छावण्या आणि चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने सध्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर व्यवस्थेवर भर दिला असून, आवश्यकता भासल्यास चारा छावण्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत.
सध्या चारासाठ्याकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. याबाबत सर्व जिल्हाधिका-ऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांना सुमारे ८३ लाख ६५ हजार १३९ मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. धुळे जिल्ह्यातही १७ लाख ४३ हजार ६८० मेट्रिक टन चाऱ्याचा साठा उपलब्ध आहे. चाराटंचाईबाबत आवश्यक ते नियोजन आणि पावले उचलण्यास सांगितले आहे. मान्सून लांबल्यास त्यासंदर्भातही नियोजन सुरू आहे.
- जितेंद्र वाघ, अपर आयुक्त