

बोधेगाव: मान्सूनपूर्व कामांची लगबग सुरू असतानाच शेवगाव तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा ठप्प झाला असून अनेक पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत. निम्म्याहून अधिक पंपांना गेल्या तीन दिवसांपासून कुलूप लागल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असताना डिझेल गायब झाल्याने ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि इतर कृषी यंत्रणा जागेवरच उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी वर्ग आता इंधन टंचाईमुळे पूर्णपणे हवालदिल झाला आहे. ऑटो, मालवाहतूक आणि खासगी वाहन व्यवसायालाही याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, इंधनाचे दर वाढलेले असतानाही तालुक्यात गेल्या काही दिवसांत विक्रीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर आधी अचानक ‘डिझेल नाही’चे फलक लावण्यात आले आणि दरवाढ लागू होताच काही वेळातच विक्री पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्राहकांची फसवणूक करून आर्थिक फायदा उचलण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे पुरवठा विभागाकडून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा केला जात असला तरी दुसरीकडे जिल्हा प्रशासन नागरिकांना अतिरिक्त साठा न करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी, तासन्तास रांगा आणि त्यानंतर लगेच ‘इंधन संपले’चे फलक झळकत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून या कडक उन्हात नागरिकांना तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना स्थानिक प्रशासनाच्या तोंडी सूचनेनुसार केवळ दोन हजार रुपयांचेच डिझेल दिले जात असल्याची तक्रार आहे. प्रशासन शासकीय वाहनांना प्राधान्य देत असताना शेती मशागतीसाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप होत आहे.
शेवगाव, बोधेगावसह तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल प्रशासनाने तातडीने परिस्थितीत लक्ष घालून नियमित इंधन पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, तालुका तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग मात्र या गंभीर परिस्थितीतही झोपेत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, साठा आहे, तर इंधन कुठे जाते? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.