ZOOM Meeting | दोन महिन्यांनी ठरलेली 'झूम' रद्द

ZOOM Meeting | दिरंगाई : बैठकीच्या माहितीबाबत उद्योजक अनभिज्ञ
ZOOM Meeting
ZOOM Meeting
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या जिल्हा उद्योग मित्र (झूम) बैठकीची हेळसांड सुरूच असून, दोन महिन्यांनंतर शुक्रवार (दि. १८) चा मुहूर्त लागला असतानाच, जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यग्रतेचे कारण देत, ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे उद्योगांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणाऱ्या उद्योजकांचा हिरमोड झाला आहे.

ZOOM Meeting
FDA Nashik | FDA ची धडक कारवाई! नाशिक विभागात 10 दिवसांत 5 कोटींचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त

बैठक होणार असल्याची माहितीही अनेक उद्योजकांपर्यंत वेळेत पोहोचली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 'झूम' बैठकीकडे जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याचे प्रभावी व्यासपीठ म्हणून पाहिले जाते. शासनाच्या विविध विभागांशी संबंधित प्रश्न एकाच ठिकाणी मांडून त्यावर निर्णय घेण्याची संधी या बैठकीत उपलब्ध होते.

त्यामुळे दर महिन्याला बैठक होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अनेक महिन्यांचा खंड पडत असल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष आहे. यापूर्वीची जिल्हा उद्योग मित्र बैठक दि. २५ जून २०२६ रोजी झाली होती. त्याआधी थेट दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी बैठक झाली होती. म्हणजेच तब्बल नऊ महिन्यांच्या खंडानंतर जूनमध्ये बैठक झाली. त्यानंतर आता पुन्हा दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.

दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारीपदी आयुष प्रसाद रुजू झाल्यानंतर आजवर केवळ एकच जिल्हा उद्योग मित्र बैठक झाली आहे. त्यामुळे उद्योगांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून अपेक्षित असलेली नियमित कार्यवाही कितपत प्रभावीपणे होत आहे, असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हा उद्योग मित्र बैठकीसाठी निमा, आयमासह विविध उद्योजक संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे मंगळवारी (दि. १५) निश्चित करण्यात आले होते. जिल्हा उद्योग केंद्राकडून त्याबाबतचे पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, बैठक होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी, गुरुवारी (दि. १७) अचानक 'अपरिहार्य कारणास्तव बैठक रद्द करण्यात येत आहे', असे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे बैठकीच्या तयारीत असलेल्या उद्योजकांना धक्का बसला.

ZOOM Meeting
Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याचे जागतिक ब्रँडिंग होणार! प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे महत्त्वाचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्तपदाचा कार्यभार

सध्या विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा प्रभारी कार्यभार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आहे. विभागीय आयुक्तांशी संबंधित महत्त्वाच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार असल्यामुळे शुक्रवारची उद्योग मित्र बैठक रद्द करण्यात आल्याचे समजते.

उद्योगांच्या प्रश्नांवर प्रशासन आणि उद्योजक यांच्यात थेट संवाद घडवून आणणारी ही बैठक नियमितपणे होणे अपेक्षित असताना, वारंवार बैठकांना विलंब आणि आता ऐनवेळी रद्द होण्याच्या प्रकारामुळे 'उद्योग मित्र' नावापुरताच उरला आहे का? असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news