

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या निमाणी चौक ते मनपा हद्द या दिंडोरी रोडच्या विकासाची महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवारी पाहणी केली. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक, नियोजित वाहनतळांपर्यंत सहज प्रवेश तसेच शहरातील एकूणच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सुमारे ८ किमी लांबीच्या या रस्त्याचा सर्वंकष विकास करण्यात येणार आहे. विकास आराखड्यानुसार रस्त्याची प्रस्तावित रुंदी ३० मीटर इतकी राहणार आहे.
आयुक्तांनी पाहणीदरम्यान कामांचा दर्जा, वेळापत्रक आणि समन्वय याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. भविष्यात रस्त्याची वारंवार खोदाई होऊ नये, यासाठी रस्ता बांधणीच्या टप्प्यातच बीएसएनएल, एमएनजीएल, एमएसईडीसीएल, पथदीप, ऑप्टिकल फायबर तसेच पावसाळी गटार यासारख्या सर्व युटिलिटी लाईन्सचे शिफ्टिंग करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रमुख चौकांत युटिलिटी क्रॉसिंगची कामे रस्ता बांधणीदरम्यानच पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता निमाणी चौक ते म्हसरुळ तसेच आळंदी कालवा ते मनपा हद्द या टप्प्यांत डीबीएम व डांबरीकरण करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणासह आधुनिक डिव्हायडर, फूटपाथची कामे, आवश्यक ठिकाणी शासकीय मालमत्तांच्या सीमा हलवण्याचे कामही या प्रकल्पात समाविष्ट आहे.
३१ मार्चपर्यंत कामाची मुदत
हा विस्तारित व सुसज्ज रस्ता कार्यान्वित झाल्यानंतर नाशिकच्या उत्तर भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने वाहनांचा प्रवाह अधिक सुरळीत होईल. म्हसरुळ, दिंडोरी परिसराशी संपर्क अधिक मजबूत झाल्याने उपनगरांचा विकास, व्यावसायिक घडामोडी आणि नागरी विस्ताराला चालना मिळणार आहे. कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने ३१ मार्च २०२७ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. कामे कालबद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.