

धुळे : राज्यातील पूरस्थिती संदर्भातील माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून याच भेटीमध्ये राज्यासाठी तीन डिफेन्स कॉरिडॉर करण्याची विनंती केली आहे. यातील एक कॉरिडोर धुळे आणि नाशिक परिसरात केला जाणार आहे. या उद्योगामुळे बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी भूसंपादनास मंजूरी देण्यात आली आहे. यासाठी देखील निधी देणार असून लोक नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या प्रांगणात आज राज्याचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ पहिलाच जनसेवा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला. यावेळी मंदाकिनीताई आमटे यांचा देखील सत्कार झाला. या कार्यक्रमास मध्यप्रदेशचे मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मंत्री जयकुमार रावल, मंत्री जयकुमार गोरे, आमदार सत्यजित तांबे, खासदार शोभाताई बच्छाव, माजी खासदार रणजीत निंबाळकर, आमदार स्मिताताई वाघ, आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंजुळाताई गावीत, आमदार अमरीशभाई पटेल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती, भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मातोश्री लताताई पाटील, भाऊ विनय पाटील व पाटील परिवारातील सर्व सदस्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अरुणभाई गुजराती यांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना संधी मिळाली असती तर यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज केले असते. असे त्यांनी यावेळी सांगितले. तर आमदार सत्यजित तांबे यांनी पाटील परिवाराच्या समाजसेवेचा तीन पिढ्यांचा वारसा टिकून आहे. या परिवाराचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान असून राष्ट्र उभारणीत देखील या परिवाराचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या समवेत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व मी जवळून पाहिले आहे. विरोधकांकडून कितीही आक्रमकपणे प्रश्न उपस्थित झाला, तरी शांत आणि विनम्रपणे त्या शंकेचे समाधान करण्याचे कसब पाटील यांच्यात होते. देशात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. राज्यात देखील परिवर्तन झाले. धुळे जिल्ह्यासाठी मनमाड इंदूरचा प्रकल्प मार्गी लागतो आहे. तर राष्ट्रीय महामार्ग रेल्वे आणि नरडाणा औद्योगिक वसाहत पूर्ण क्षमतेने सुरू होऊन आगामी काळात रोहिदास पाटील यांचे स्वप्न आपण पूर्ण करू पण माजी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्यासारखीच कार्यपद्धती स्वीकारावी, असा सल्ला देखील मुख्यमंत्री यांनी दिला.
राज्यातील पूरस्थितीची माहिती देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. याच वेळेस आपण डिफेन्स कॉरिडॉर करण्याचा संदर्भात मागणी केली आहे. यातील एक प्रकल्प नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या परिसरात होणार असून या दोन्ही जिल्ह्यातील हजारो हातांना काम मिळणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाखाची मदत
राज्यातील पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे .त्यामुळे शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 50 लाख रुपये देण्याची घोषणा आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी केली. तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी गोळा केलेला दोन लाखाच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेलीपॅड वर दिला.