

देवळाली कॅम्प (नाशिक) : देशभरातील १०३ पुनर्विकसित अमृत भारत रेल्वेस्थानकांत समावेश असलेल्या देवळाली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने शासनाचा खर्च व्यर्थ झाला की काय, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे
भुसावळ विभागातील देवळालीसह मूर्तिजापूर, धुळे व लासलगाव या पुनर्विकसित अमृत भारत रेल्वेस्थानकांचे लोकार्पण २२ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या स्थानकांचा विकास "अमृत भारत स्टेशन योजना"अंतर्गत करण्यात आला. या स्थानकांवर भव्य प्रवेशद्वार, आकर्षक फसाड, हाय मास्ट लायटिंग, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि दिव्यांग व वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प यांसारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
हे स्थानक आता केवळ प्रवासाचे केंद्र राहिले नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र बनले आहे. देवळाली रेल्वे स्टेशन येथे लाख रुपये खर्च करून सुधारणा करताना त्यात तिकीट विक्री केंद्राचाही समावेश करण्यात आला. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर जनतेच्या आग्रहास्तर व प्रशासनाच्या मंजुरीनुसार तिकीट खिडकी बनवण्यात आले. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हे केंद्र बंद असल्याने येथून एकही तिकीट विक्री झालेले नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनाची उदासीनता यातून दिसून येते, तसेच स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीनसुद्धा मुख्य प्रवेशद्वारावर लावणे आवश्यक होते तेदेखील लावण्यात आलेले नाही.
अमृत भारत योजनेंतर्गत केंद्र सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रेल्वेला अत्याधुनिक स्वरूप देऊ पाहत आहे. मात्र देवळालीत अद्यापही तिकीट विक्री केंद्र सुरू करण्यात आले नाही हे केवळ देखाव्याचे उदाहरण आहे.
रतन चावला, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट