

Child Death Deola
देवळा : मामाच्या गावाला आलेल्या एका तीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना देवळा तालुक्यातील धोबीघाट (दहिवड) येथील शिवारात गुरुवारी (दि.४) रोजी घडली. यामुळे येथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वायगाव (ता. सटाणा) येथील कृष्णा महेश अहिरे (वय ३) असे या बालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कृष्णा महेश अहिरे हा धोबीघाट ( दहिवड) शिवारात त्याच्या मामाच्या घरी आला होता. गुरुवारी (दि.४) रोजी दुपारी तीन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान तो तेथील सिमेंटच्या पाण्याच्या टाकी जवळ खेळत होता. यावेळी तो पाण्याच्या टाकीत पडला.
कृष्णा दिसत नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. तर तो पाण्याच्या टाकीत बुडालेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने दहिवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.