

देवळा : नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत देवळा शहरात रविवार दि.३१ रोजी गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन लाख ४३ हजार २८२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखामाल व दीड लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ४ लाख ९३ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त शशीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक भड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे रविवार दि. ३१ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देवळा शहरातील निमगल्ली परिसरात शारदादेवी विद्यालयाजवळ हि कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान रामचंद्र निळकंठ जगदाळे यांच्या टाटा कंपनीचे छोटा हत्ती ह्या वाहनातून (एमएच ४१ एजी ११६४) प्रतिबंधित गुटखा मालाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीमध्ये वाहनात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. सदर कारवाई करताना आरोपी रामचंद्र जगदाळेने गाडी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी गाडी ताब्यात घेतली व अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांनी प्रसंगावधान राखत पळून जाणाऱ्या जगदाळेस पाठलाग करून शिताफीने पकडले व पोलिस स्टेशनला आणून पुढील कारवाई केली. यानंतर संबंधित वाहनासह संपूर्ण माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
देवळा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री सर्रास सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक किराणा दुकाने, टपऱ्या व काही व्यावसायिक आस्थापनांमधून खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत चाललेल्या गुटखा सेवनामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
यापूर्वीही तालुक्यात विविध ठिकाणी गुटखा जप्तीच्या कारवाया झाल्या असल्या तरी विक्रीचे जाळे पूर्णपणे थांबलेले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गुटखा वाहतूक करणारी वाहने पकडण्याबरोबरच किरकोळ विक्रेते, साठेबाज, आणि पुरवठा साखळीवरही कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
‘गुटखा व सुगंधित तंबाखूविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अवैध साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांविषयी माहिती प्रशासनाला द्यावी, माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल.’
संदीप देवरे (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिक)