

देवळा (नाशिक) : कांदा आणि मका या दोन्ही पिकांना मिळणारा कवडीमोल भाव पाहून शेतकरी संतापले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे सोमवारी (दि.24) रोजी दुपारी ११ वाजता देवळा बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, निवासी नायब तहसीलदार बबन अहिरराव आणि बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी देशाच्या पाठीचा कणा मानले जात असताना त्यांना आज अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तरीही महायुती सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महायुती सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाने मक्याचा बाजारभाव २४०० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असतानाही सध्या मका फक्त १२०० ते १३०० रुपये दराने खरेदी केला जात आहे. त्यातच मार्केट फेडरेशनही नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यास पुढे नाही.
कांद्याच्या बाबतीतही मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी कांदा चाळीत सडून गेला असून उरलेला कांदा फक्त ७०० ते ८०० रुपये दराने विकावा लागत आहे. त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल किमान १००० रुपयांचे अनुदान तत्काळ जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच निवडणुकीत महायुतीने दिलेले सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण करून कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पुन्हा करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार संघटनेचे उमेश आहेर, सोमनाथ शिंदे, विलास शिंदे, आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, खंडू जाधव यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.